होमपेज › Belgaon › काँग्रेस सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास घडविला

काँग्रेस सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास घडविला

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 10:30PM

बुकमार्क करा

हल्याळ : वार्ताहर 

आपल्या साडेचार वर्षांच्या सत्तेच्या काळात राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यात आला आहे. अन्नभाग्य, क्षीरभाग्य यासारख्या अनेक योजना सुरू करण्यात आल्याने राज्यातील जनता आज स्वास्थ्यपूर्ण जीवन जगत आहे. आमचे सरकार राज्यातील जनतेच्या भूक, निरक्षरता, अनारोग्य यासारख्या समस्या दूर करीत आहे. मात्र, भाजप कर्नाटकाला काँग्रेसमुक्त करण्यासाठी धडपडत असून भाजपचा हा प्रयत्न निव्वळ हास्यास्पद आहे. भाजप कदापि यशस्वी होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यानी सडेतोडपणे सांगितले.

हल्याळ शहरात 517 कोटी रु.खर्चाची विविध विकासकामांची कोनशिला बसविणे व पूर्णत्वास आलेल्या कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
भाजपने राज्यातून यात्रा काढून मतदारांवर छाप पाडण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आम्ही कोणतीही यात्रा न काढता विकासाच्या मार्गाने  वाटचाल करीत विविधकामांचा प्रारंभ, पायाभरणी असे जनहिताचे कार्य करीत आहोत. भाजपचे नेते येडियुरप्पा, जनार्दन रेड्डी, कट्टा सुब्रमण्यम नायडू खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेत, असा गौप्यस्फोटही सिद्धरामय्यांनी केला. राज्यातील काँग्रेसमध्ये असे नेते दिसून येणार नाहीत, असेही त्यानी ठामपणे सांगितले. 

उद्योगमंत्री आर.व्ही.देशपांडे यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशपांडे हे एक अजातशत्रू राजकारणी आहेत. त्यांना  हल्याळ भागातील मतदार कायमच पाठिंबा व आशीर्वाद देणार, असा आपला विश्‍वास आहे. ना.देशपांडे यांच्या आग्रही मागणीमुळे आज काळी नदी पाणी योजनेचा प्रारंभ करण्यात येत असून येत्या 1 जानेवारी रोजी दांडेलीला नवा तालुका म्हणून घोषणा करण्यात येईल, असे सिद्धरामय्या यानी सांगितले.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री एच.सी.महादेवप्पा व विधानपरिषद सदस्य एल.एल.घोटणेकर यांची भाषणे झाली. आ.घोटणेकर यानी आपल्या भाषणात, मराठा समाजाचा 2 ए प्रवर्गात समावेश होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मराठा नेतेमंडळींच्या वतीने तलवार भेटीदाखल देण्यात आली.
कार्यक्रमाच्या मंचावर  आ.सतीश सैल, मंकाळु वैद्य, हल्याळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सुभाष कोर्वेकर, नगराध्यक्ष उमेश बोळशेट्टी, जि.पं.उपाध्यक्ष संतोष रेणके, सदस्य कृष्णा पाटील, श्रीनिवास घोटणेकर  आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी, जिल्हाधिकारी एस.एस.नकुल यांनी उपस्थितांंचे स्वागत केले.