Sun, Aug 18, 2019 20:37होमपेज › Belgaon › हागणदारीमुक्‍त गावांचा उल्‍लेख केवळ कागदोपत्री

हागणदारीमुक्‍त गावांचा उल्‍लेख केवळ कागदोपत्री

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 12 2018 8:03PMनिपाणी : राजेश शेडगे

स्वच्छ भारत अभियानांतर्गत निपाणी शहरासह  मतदारसंघातील आडी, बेनाडी, सिदनाळ, हुन्नरगी आणि बारवाड ही पाच गावे हागणदारीमुक्‍त झाल्याची नोंद कागदोपत्री दाखविण्यात आली आहे.  प्रत्यक्षात ही गावे हागणदारीमुक्‍त झाली का, अशी विचारणा नागरिकांतूनच होत आहे. संबंधित ग्रामपंचायतींचे ग्रामविकासाधिकारी आणि सचिव स्वतःची पाठ थोपटून घेत अधिकार्‍यांकडून सत्कार करवून घेण्यात मश्गुल आहेत. 

निपाणी पालिकेलादेखील 2 फेब्रुवारी 2018 रोजी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाने हागणदारीमुक्‍तीचे स्वच्छता प्रमाणपत्र दिले आहे. प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात उघड्यावर शौचालयास बसणार्‍यांची संख्या अधिक आहे. यामुळे केवळ कागदोपत्री हागणदारीमुक्‍ती काय कामाची, अशी विचारणा होत आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन 2011-12 मधील सर्वेक्षणानुसार निपाणी तालुक्यातील आडी, बेनाडी, सिदनाळ, हुन्नरगी आणि बारवाड ही गावे हागणदारीमुक्‍त झाल्याचा अहवाल तालुका प्रशासनाला पाठविला आहे. पण आडी गावात आजही जैनवाडी रस्ता, भिवशी रस्ता, सौंदलगा रस्ता व बेनाडी बेघर वसाहतीच्या रस्त्यावर उघड्यावर शौचास बसणार्‍यांची संख्या अधिक आहे. यामुळे येथे 100 टक्के हागणदारीमुक्‍ती झाली, असे म्हणता येणार नाही.

आडीतील ग्रामपंचायत परिसर, सार्वजनिक दवाखाना, फिल्टर हाऊस परिसरात नागरिक उघड्यावरच शौचास बसतात. केवळ शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण केले म्हणजे हागणदारीमुक्‍ती नव्हे. अनेक नागरिक शौचालये असताना उघड्यावरच विधीस जातात. त्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे, असे मत राजकुमार पाटील यांनी व्यक्‍त केले.

हुन्नरगीत मातंग समाज बसवाण मंदिर रस्ता, सिदनाळ ते हुन्नरगी रस्ता, हॉस्टेलच्या मागील परिसर, बेनाडी रोडवर उघड्यावर शौचविधी केला जातो. गावात शौचालयांचे 100 टक्के बांधकाम झालेले नाही. सिदनाळ गावातील मशिदीजवळील सार्वजनिक शौचालय पाण्याची सोय नसल्याने बंद आहे. बसस्थानक परिसरात अनेक नागरिक उघड्यावर  शौचास जातात.

बेनाडीतील मंगावते माळ रस्ता, आडी रस्ता, कुन्नूर रस्ता व हुन्नरगी रस्त्यावर शौचविधी केला जात असताना या गावाचाही हागणदारीमुक्‍तीमध्ये समावेश केला गेल्याने नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दोन महिन्यापूर्वी येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने उघड्यावर शौचास जाणार्‍या नागरिकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला होता. गावात कुटुंब संख्येच्या तुलनेत शौचालये आहेत का, असा सवाल  करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री नोंद असलेल्या हागणदारीमुक्‍त शौचालयाबाबत संतापजनक प्रतिक्रियाही उमटत आहेत.