Sun, Aug 25, 2019 08:01होमपेज › Belgaon › वाळू पुरवठा मागणीसाठी भव्य मोर्चा

वाळू पुरवठा मागणीसाठी भव्य मोर्चा

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 05 2018 11:37PMनिपाणी : प्रतिनिधी

काही दिवसांपासून वाळूचा पुरवठा बंद आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे सरकारने वाळूपुरवठा सुरू करावा. या मागणीसाठी निपाणीत 3 रोजी तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चामध्ये माजी आ. प्रा.सुभाष जोशी, माजी आ. काकासाहेब पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक यांच्यासह बांधकाम असोसिएशनचे पदाधिकारी, कामगार, इंजिनिअर, आर्कीटेक्ट, वाळू पुरवठादार, विक्रेते यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांचा लक्षणीय सहभाग होता.
सकाळी केएलई कॉलेजपासून मोर्चाला सुरूवात झाली. मानवी कॉम्प्लेक्स, संभाजी राजे चौक, निपाणी मेडिकल, नगरपालिकामार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

बांधकाम कामगार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गोईलकर यांनी मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला. तहसीलदार कार्यालयासमोर झालेल्या सभेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते मोहन बुडके म्हणाले, निपाणी परिसर वगळता इतरत्र कायमस्वरूपी वाळू पुरवठा सुरू आहे. निपाणी परिसरातील नागरिकांवर अन्याय  होण्याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार आहे. आठ दिवसात पूर्ववत पासधारकांना वाळूपुरवठा करून न दिल्यास तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडू.

नगराध्यक्ष गाडीवडर  यांनी, पास वाहनधारकांना अडविण्याचा अधिकार पोलिस प्रशासनाला नाही. सर्व वाळूपुरवठा पासधारकांनी नियमितपणे वाहतूक सुरू ठेवावी, असे सांगितले.
माजी आ. सुभाष जोशी म्हणाले, मुळात बांधकाम कामगाराची संघटना स्थापन होऊन 8 ते 9 महिने झाले. त्यामध्ये वाळू पुरवठादारांचा सहभाग नव्हता. वस्तूत: वाळू वाहतुक पासधारकांचीही पोलिसांकडून अडवणूक सुरू आहे. सदर प्रकार चुकीचा असून पोलिसांना न घाबरता आपला  व्यवसाय नियमित सुरू ठेवावा. माजी आ. काकासाहेब पाटील यांनी, निपाणीसह परिसरात वाळूचा जटिल प्रश्‍न बनला आहे. वाळूचा पुरवठा पूर्ववत सुरू राहावा. याबाबत सूचना संबंधित खात्याला देऊनही गांभीर्य घेतलेले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांकरवी सरकारच्या नरजेस सदर बाब आणून देण्यात येईल, असे सांगितले.

उपतहसीलदार एन. बी. गेज्जी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सभापती नितीन साळुंखे, नगरसेवक संजय सांगावकर, रवी चंद्रकुडे, सुधाकर कुर्‍हाडे, दीपक वळीवडे, गजानन शिंदे, कपील शिंदे, सुहास परमणे यांच्यासह बांधकाम कामगार असोसिएशनचे पदाधिकारी  सदस्य व कामगार उपस्थित होते. विशेष म्हणजे कामगार हातात डबे घेऊनच मोर्चात सहभागी झाले होते.