Wed, Jul 17, 2019 19:01होमपेज › Belgaon › एकूण प्रभाग 25 कर्मचारी 25, हजर मात्र शून्य!

एकूण प्रभाग 25 कर्मचारी 25, हजर मात्र शून्य!

Published On: Apr 11 2018 1:34AM | Last Updated: Apr 11 2018 12:26AMबेळगाव : प्रतिनिधी   

जिल्ह्यातील सर्व खात्यांचे प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. याचा परिणाम मनपाच्या नागरी सुविधांवर होत आहे. शहरातील कोणत्याही कार्यालयात काही प्रमाणपत्रांसाठी गेले तर ‘साहेब इलेक्शन ड्युटीवर आहेत’ असेच सांगितले जाते. असाच प्रकार गोवावेस येथील महानगरपालिकेच्या महसूल कार्यालयात मंगळवार दि. 10 रोजी पाहायला मिळाला. या कार्यालयात एकूण 25 कर्मचारी, पण एकाचाही पत्ता नव्हता. 

प्रभाग 1 ते 25 पर्यंतच्या नागरिकांचा घरफाळा या कार्यालयात भरून घेतला जातो. मंगळवारी याच कामासाठी शेकडो नागरिकांनी सकाळी 10 पासूनच गर्दी केली होती. परिसरातून 6 ते 7 कि. मी. अंतरावरून ज्येष्ठ नागरिकांनी हजेरी लावली होती. या कार्यालयात एकूण 25 प्रभागांसाठी सुमारे 25 वरिष्ठ व कनिष्ठ कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. मात्र मंगळवारी सकाळी 10 पासून दुपारी एक वाजेपर्यंत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. सकाळी 10 पासूनच मोकळी जागा, प्लॉट, घरफाळ्याचे चलन काढण्यासाठी नागरिक रांग लावून उभे होते. साहेब आता येतील, नंतर येतील म्हणून उपस्थित नागरिकांनी वाट पाहिली. शेवटी तेसंतापून माघारी फिरले. असा प्रकार सातत्याने होत आहे. 

जिल्ह्यात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक कामासाठी जिल्हा प्रशसनाने या कार्यालयातील सर्वच कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे का? की येथील जबाबदार कर्मचार्‍याने दांडी मारली आहे, असे प्रश्‍न उपस्थित नागरिकांतून विचारले जात आहेत. या कार्यालयाच्या सावळ्या गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. 10-10 दिवस झाले तरी चलन मिळत नाही. दहा दिवसांनी पुन्हा गेले की पुन्हा चार दिवसांनी या म्हणून सांगितले जात आहे. मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गरजेपुरत्या कर्मचार्‍यांची तरी नियुक्ती करावी. अन्यथा या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.
 

Tags : government staff, engage, election duty,belgaon news