Thu, Jul 18, 2019 04:09होमपेज › Belgaon › गोवावेस गाळा लिलावास स्थगिती

गोवावेस गाळा लिलावास स्थगिती

Published On: Aug 01 2018 1:21AM | Last Updated: Aug 01 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

मनपा मालकीच्या दुकान गाळ्यांची लिलाव प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात आली. मात्र गोवावेस येथील गाळ्याबाबत सध्याच्या गाळेधारकाने न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रक्रिया वगळता अन्य गाळ्यांचे लिलाव करण्यात आले. उर्वरित चार गाळ्यांपैकी दोन गाळ्यांना प्रतिसाद लाभला. पीबी रोड, गोवावेस आणि माळमारुती येथील गाळ्याबाबत मनपाने लिलाव प्रक्रियेची घोषणा मनपाने केली होती. त्यानुसार इच्छुकांनी अनामत रक्‍कम जमा करून लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला होता. 

गोवावेस येथील एका गाळ्याचा लिलाव होणार होता. परंतु, सुनिल जी. मुतगेकर यांनी न्यायालयात धाव घेऊन लिलाव प्रक्रियेला न्यायालयातून स्थगिती मिळविली. यामुळे तो लिलाव होऊ शकला नाही. याबाबतची माहिती कायदा विभागाच्या अधिकार्‍यांनी  दिली. पीबी रोडवरील मोडक्या बाजाराजवळ असणार्‍या गाळा क्रं. 6 चा लिलाव करण्यात आला. 

लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या माजी जि. पं. सदस्य पुंडलीक कारलगेकर यांनी गाळ्यासाठी निश्‍चित करण्यात आलेले किमान भाडे अधिक असल्याची तक्रार केली. याठिकाणी सध्या उड्डाणपूल झाला आहे. त्याचबरोबर भाजी मार्केटची वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ग्राहक या भागाकडे वळत नसल्याची तक्रार केली. 

यावर अधिकार्‍यांनी सरकारी मार्गसूचीनुसार गाळ्याचे भाडे निश्‍चित करण्यात आल्याचे सांगितले. सदर गाळ्यासाठी 16 हजार 950 इतके किमान मासिक भाडे निश्‍चित केले होते. हा गाळा 17 हजार 100 रुपये भाड्याने घेण्यात आला.

माळमारुती येथील तीन गाळ्यांचा लिलाव करण्यात आला. यासाठी 5 हजार 200 इतके किमान भाडे निश्‍चित केले होते. त्यापैकी केवळ एका गाळ्याला प्रतिसाद लाभला. 5 हजार 275 इतक्या मासिक भाड्याला लिलाव झाला. यावेळी महसूल अधिकारी ए. एस. कांबळे, लेखाधिकारी एम. व्ही दीक्षित, व्ही. डी. महांतशेट्टी, व्ही. सी. नरगट्टी, फारुक यड्रावी यांनी लिलाव प्रक्रिया पार पाडली.