Sun, Apr 21, 2019 02:32होमपेज › Belgaon › आधी ‘गोगटे’ नंतर ‘तिसरे रेल्वे गेट’

आधी ‘गोगटे’ नंतर ‘तिसरे रेल्वे गेट’

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:35AMबेळगाव : प्रतिनिधी

तिसरे रेल्वे गेट येथे 15 जुलैपासून रेल्वे उड्डाण पूल उभारणीची सूचना मंगळवारी देण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. प्रशासनाने पहिल्यांदा रावसाहेब गोगटे चौकातील रेल्वे उड्डाण पूल तयार करावा. यानंतर तिसर्‍या रेल्वे गेट उभारणीचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

शहरातील विकासकामांना चालना देण्यासाठी खा. सुरेश अंगडी यांनी रेल्वेसह विविध खात्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी शहरातील प्रमुख मार्ग समजल्या जाणार्‍या बेळगाव-खानापूर रोडवरील तिसर्‍या रेल्वे गेट येथे उड्डाणपूल उभारणीला सुरुवात करावी, अशी सूचना केली आहे.

यामुळे या भागातील नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. गोगटे चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम कूर्म गतीने सुरू आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. हा पूल रेंगाळत चालल्याने वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागत आहे. यामुळे हा पूल 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. परंतु तत्पूर्वीच तिसरे रेल्वे गेट येथे उड्डाणपूल उभारणीचा निर्णय घेण्यात आला. परिणामी या भागातील नागरिकांच्या अडचणीत भर पडणार आहे.

या परिसरात अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल, पानटपरी, गॅरेजीस, मार्बल विक्री दुकाने आहेत. त्यांची रोजीरोटी येणार्‍या ग्राहकांवर अवलंबून आहे. ऐन पावसाळ्यात रेल्वे पूल उभारणीस सुरुवात केल्यास याचा फटका त्यांच्या व्यवसायाला बसणार आहे. या भागात असणार्‍या दुकानामध्ये सुमारे 50 हून अधिक कामगार कार्यरत आहेत. त्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तिसरे रेल्वे गेट पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी गोगटे रेल्वे पूल पूर्ण करावा. नंतरच या पुलाचे काम प्रशासनाने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.