Wed, Aug 21, 2019 19:18होमपेज › Belgaon › विकासाचे ध्येय, पण गाठण्याचे आव्हान 

विकासाचे ध्येय, पण गाठण्याचे आव्हान 

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीतील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत मांडला खरा. तो विकासााच्या ध्येयाने प्रेरित असला तरी तो विकास गाठण्याचे आव्हान आहे. शिवाय राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम (नॅशनल हेल्थ स्कीम) सोडल्यास भरीव काहीच हाती लागलेले नाही, असे मत शहरातील तज्ञांनी ‘पुढारी’ने  आयोजिलेल्या चर्चासत्रात मांडले.

पुढल्या वर्षी होणारी निवडणूक समोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आल्याची टीकाही काही तज्ञांनी केली. तर रोजगार, कृषी, शैक्षणिक आणि आरोग्य या चार क्षेत्रांतील योजना जनताभिमुख असल्याच्या प्रतिक्रिया काही तज्ञांनी व्यक्त केल्या.

‘पुढारी’च्या चर्चासत्रात ज्येष्ठ सीए श्रीकृष्ण केळकर, अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. अनिल कालकुंद्रीकर, सहकार तज्ञ मनोहर देसाई, बांधकामतज्ज्ञ राजेंद्र मुतकेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील चौगुले, अ‍ॅड. बाळकृष्ण कांबळे,  आनंद अ‍ॅड्सचे अनंत लाड सहभागी झाले होते. तज्ञांनी या अर्थसंकल्पाला  एकूण दहा गुणांपैकी सर्वंकष 6 गुण दिले.

सध्या बँकांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्यासाठी वेगळी पाऊले उचलणे गरजेचं होते. गुंतवणूक जास्त झाली तरच आठ टक्के विकासदर गाठणे शक्य आहेत. अर्थसंकल्पामध्ये महिला विकासाबद्दल ठोस भूमिका घेतली नाही. 
- अनिल कालकुंद्रीकर, 
अर्थशास्त्र तज्ज्ञ
एकूण गुण : 6

भागीदारीतील व्यवसाय आणि मालकी व्यवसाय यामध्ये सरकारने का दुजाभाव करावा? हे सरकारचे धोरण चुकीचे आहे. त्याबरोबरच व्यावसायिक आणि नोकरदार यांना करसवलत देतानाही दुजाभाव आहे. शैक्षणिक संस्थाविषयी घेतलेले निर्णय यापूर्वी घेणे गरजेचे होते. सद्यस्थितीत शिक्षण सस्थांचे व्यावसायिकरण झाले .
    -श्रीकृष्ण केळकर, सीए
    एकूण गुण : 6

2022 पर्यंत प्रत्येकाला घर उपलब्ध करून दिले जाईल असे आश्‍वासन सरकारने दिले आहे. मात्र, या बजेटमुळे घरांचे स्वप्न साध्य होईल असे वाटत नाही. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कसा घ्यावा, हे बँकांनाही माहीत नाही. मग तो लाभ सामान्यांपर्यंत कसा पोचणार?  
-राजेंद्र मुतगेकर, उद्योजक
एकूण गुण : 5.5

अर्थसंकल्पात शेती, शेतीविषयक औजारे यासंबंधी ठोस निर्णय घेण्यात आला नाही. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी ठोस उपाययोजना आखणे गरजेचे 
होते. फक्त बीएड अभ्यासक्रमातून काय साध्य होणार?  शिवाय महागाईवर अंकुंश येईल असे वाटत नाही.
-अ‍ॅड. बाळकृष्ण कांबळे
एकूण गुण : 4

सर्वसामान्यांसाठी हे चांगले बजेट आहे. डॉक्टरांवर अंकुश ठेवण्याचा निर्णयही केंद्रसरकारने घेतले आहेत. शैक्षणिक विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. शेतीसाठी चांगल्या तरतूदी केल्या आहेत. तसेच रोजगार वाढतील, अशी आशा आहे.
-सुनिल चौगुले, वरिष्ठ उपाध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स
एकूण गुण : 10

हे बावरलेलं व गांगरलेलं बजेट आहे. यातून सहकार क्षेत्राला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न दिसतो.  नोटाबंदी व जीएसटीनंतर झालेल्या चुका सुधारल्या जातील असं वाटलं होतं, पण त्या सुधारण्यात आलेल्या नाहीत. याचा वाईट परिणाम काही दिवसात जाणवेल. पण आरोग्यासाठी चांगल्या तरतुदी आहेत.
मनोहर देसाई, सहकार तज्ज्ञ
एकूण गुण : 6

शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत चांगले पाऊल आहे. बी.एड प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची सरकारची योजना स्तुत्य आहे. ब्लॅक बोर्ड ते डिजीटल बोर्ड या योजनेद्वारे नवी पिढी डिजिटललायझेशनला जोडली जाईल. देशाअंतर्गत विमानसेवा वाढविण्याच्या दृष्टीने चांगले प्रयत्न आहेत.
अनंत लाड, आनंद अ‍ॅड्स
एकूण गुण : 7