Tue, Jun 18, 2019 22:36होमपेज › Belgaon › हत्ती कँप नकोच

हत्ती कँप नकोच

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 27 2017 11:02PM

बुकमार्क करा
गवसे ः गिरीश पाटील 

आजरा तालुक्यात अनेक वर्षांपासून शेतातील पिकांचे मोठे नुकसान करत असलेल्या हत्तींच्या बंदोबस्तासाठी शासनाने ठोस उपाययोजना केली असून, या हत्तींना शिकाऊ हत्तींच्या मदतीने माणसाळून त्यांना घाटकरवाडी (ता. आजरा) या गावाजवळ तयार करण्यात येणार्‍या हत्ती कँपमध्ये ठेवण्याची तयारी चालू केली आहे; मात्र या गावातील ग्रामस्थांनी हत्ती कँपला पूर्णपणे विरोध दर्शविला असून, हा कँप घाटकरवाडी गावावर जबरदस्तीने लादण्यात येत असल्याने वेळप्रसंगी या कँपविरोधात घाटकरवाडीचे ग्रामस्थ धरणे, आंदोलन, उपोषण करण्यातदेखील मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा सरपंच वैजयंता पाटील-अडकूरकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील जंगली हत्तींचा उपद्रव कमी करण्यासाठी हत्तींना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी आजरा तालुक्यातील  घाटकरवाडी येथे हत्ती कँप साकारला जाणार असून, या कँपचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. पण, भविष्यातील गोष्टींचा विचार करता, या कँपला घाटकरवाडी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. हा कँप घाटकरवाडी येथे होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी शासनदरबारी प्रयत्न चालवले असून, वन विभागाला मागणीचे निवेदन दिले आहे. तसेच खुद्द शासनाकडून हत्तींच्या अभ्यासकालाच या गावातील ग्रामस्थांनी निवेदन दिले होते. त्यांनीदेखील हे गाव हत्ती कँपला योग्य नसल्याचे आपले मत व्यक्त केले होते. असे असतानाही ग्रामस्थांच्या मागण्या धुडकावून शासनाकडून हत्ती कँपला अंतिम मंजुरी दिली आहे.

त्याचा मोठा तोटा या गावातील ग्रामस्थांना भोगावा लागणार आहे. घाटकरवाडीऐवजी चंदगड तालुक्यात कर्नाटकाच्या हद्दीतून हत्ती प्रवेश करतात. त्या तिलारी परिसरात हत्तीचा कँप उपयुक्त ठरला असल्याचे मत या गावातील माजी सरपंच गोविंद पाटील यांनी व्यक्त केले. हत्ती कँप या गावात घेऊ देणार नसल्याचे मत सरपंच वैजयंता पाटील-अडकूरकर यांनी व्यक्त केले. प्रसंगी यासाठी धरणे, आंदोलने, उपोषणदेखील करण्यात येतील. घाटकरवाडी गावात हत्ती कँप बसविण्याची तयारी काही दिवसातच सुरू होणार आहे; पण ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे हा कँप वादग्रस्त ठरण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. हा कँप होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, वन विभागाकडे आपण दाद मागणार असल्याचेही सुरेश पाटील, लहू पाटील, हंबीरराव अडकूरकर, हरी पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.