Mon, Apr 22, 2019 04:22होमपेज › Belgaon › बेळगावात दंगलीचा होता कट

बेळगावात दंगलीचा होता कट

Published On: Jul 02 2018 1:42AM | Last Updated: Jul 02 2018 12:44AMबंगळूर : प्रतिनिधी

बहुचर्चित ‘पद्मावत’ हा हिंदी चित्रपट जानेवारी 25 रोजी प्रदर्शित झाला. हिंदुत्वासंबंधी आक्षेपार्ह दृश्ये असल्याच्या चर्चेने त्याविरोधी बेळगावात जोरदार आंदोलन, दंगल घडविण्याचा कट नोव्हेंबरमध्ये आखण्यात आल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयितांनी विशेष तपास पथकाला (एसआयटी) ही माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

अशा कृत्यांसाठी संपूर्ण कर्नाटकात पाच वर्षांमध्ये एकूण 60 जणांना गुप्त ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते. पेट्रोल बॉम्बसह विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर कसा करावा, याची माहितीही त्यांना देण्यात आली. यापैकी सुमारे तीस जणांना घातक कृत्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. धर्मरक्षणासाठी  दगडफेक, शस्त्र चालविणे, जाळपोळ, हत्यांसाठी त्यांची मानसिक आणि शारीरिक तयारी करण्यात आली होती. याबाबतची माहिती कर्नाटक अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आली आहे.

5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची हत्या झाली. त्या प्रकरणी काही महिन्यांत एसआयटीने सहा जणांना अटक केली. पैकी अमोल काळे (37, पुणे), अमित दिग्वेकर (38, गोवा), सुजितकुमार (38, शिकारीपूर, जि. शिमोगा), मनोहर येडवे (29, विजापूर) या चौघांवर संघटना मजबूत करण्याची तसेच हिंदुत्ववादी युवकांची भरती संघटनेत करण्याची जबाबदारी होती. काही वर्षांमध्ये त्यांनी अनेकांना संघटनेसाठी निवडले. 

परशुराम वाघमारे (26, सिंदगी, जि. विजापूर) आणि  के. टी. नवीनकुमार (37, मद्दूर, जि. मंड्या) यांना गेल्या वर्षी संघटनेत सामील करण्यात आले. यापैकी वाघमारेला गौरी लंकेश यांचे हिंदुत्ववादाविरोधातील व्हिडीओ दाखविण्यात आले. त्याआधी त्याला गौरी यांच्याविषयी काहीच माहीत नव्हते. काहींनी त्याचे ‘ब्रेन वॉश’ करून हत्येसाठी तयार केले. नवीनकुमारने अशा कृत्यासाठी पिस्तूल खरेदी केले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी पुरोगामी साहित्यिक के. एस. भगवान यांच्या हत्येचा कट आखला. त्यासाठीच नवीनकुमारने नवी पिस्तूल खरेदी केली आणि तो एसआयटीच्या जाळ्यात सापडला. सुजितकुमार आणि काळे यांच्याकडे मिळालेल्या साहित्यातून दोघांनीही अनेकांना संघटनेत भरती केल्याचे समजते. यापैकी सुजितकुमारने कर्नाटकातून सर्वाधिक युवकांना भरती केले. त्यांना पेट्रोल बॉम्बचे तर काहींना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. 

बेळगावसह विविध ठिकाणी युवकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर हिंदुत्ववादी संघटनांची बैठक घेतली जात होती. प्रशिक्षित युवक घातक कृत्यांसाठी योग्य आहेत की नाही, याची चाचपणी काळे करत होता. दरम्यान, गोवा येथे झालेल्या हिंदू संघटनेच्या कार्यक्रमात नवीनकुमारने जहाल भाषण केले होते. सुजितकुमारने त्याला गाठले आणि गौरी यांच्या हत्येसाठी पिस्तूल                              
पुरविण्याची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली. 

तेव्हा काय घडले....
पद्मावत चित्रपट बेळगावात गेल्या 25 जानेवारी रोजी प्रकाश चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. रात्री 9 च्या खेळाआधी 8.15 च्या सुमारास चित्रपटगृह आवारात पेट्रोल बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यात दोघे किरकोळ जखमी झाले होते. मात्र स्फोटामुळे बेळगावात काही काळ तणावाचे वातावरण होते.

दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी हा स्फोट घडवून आणला होता. दोघांच्याही चेहर्‍यावर बुरखा होता. त्यामुळे ते सीसीटीव्ही चित्रणात दिसत असूनसुद्धा बराच काळ पोलिसांना त्यांच्यापयर्ंत पोहचता आले नव्हते. मात्र 15 फेब्रुवारी रोजी बेळगाव पोलिसांनी खानापूरजवळच्या हलकर्णी गावातील संभाजी मारुती पाटील या युवकाला या प्रकरणात अटक केली. संभाजी हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता आहे. अटकेनंतर काही काळ तो न्यायालयीन कोठडीत होता. सध्या तो जामिनावर आहे. संभाजीच्या अटकेमुळे हिंदुत्ववादी संघटनांनीच स्फोटाचे नियोजन केले होते, हे स्पष्ट झाले.

नवीनकुमारवर धमकीचा आरोप
या प्रकरणातील साक्षीदार गिरीश याने नवीनकुमारने आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे. नवीनकुमारने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून, सुनावणीवेळी हा आरोप करण्यात आला. गिरीश हा नवीनकुमारचा चुलत भाऊ आहे. त्याने हिंदू संघटना स्थापन केली, त्यावेळी गिरीश पहिला सदस्य होता. गौरी यांच्या हत्येच्या कटाबाबत त्याला माहिती समजली होती. तशी साक्ष त्याने न्यायालयात दिली होती. नवीनकुमारच्या धमकीनंतर गिरीशच्या वकिलाने आपला अशील साक्ष मागे घेणार असल्याचे सांगितले होते.