Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या: अनेक हत्यांचा होता कट?

गौरी लंकेश हत्या: अनेक हत्यांचा होता कट?

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी विशेष पोलिस पथकाने (एसआयटी) आणखी एकास तुमकूरमध्ये अटक केली. एच. एल. सुरेश असे त्याचे नाव असून त्याने इतर संशयितांना आपली खोली भाडेकरारानुसार दिल्याचे एसआयटीच्या चौकशीत उघड झाले आहे. दरम्यान, राजेश बंगेराकडून 20 काडतुसे इतर संशयितांनी मिळविली होती. त्यामुळे अनेकांची हत्या करण्याचा त्यांचा डाव होता, असा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे.

याद्वारे एसआयटीने गेल्या चार दिवसांत चौघांना तर एकूण दहा संशयितांना अटक केली आहे. सुरेश याला अटक करून तिसर्‍या एसीएमएम न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याआधी अटक करण्यात आलेले संशयित परशुराम वाघमारे आणि सुजीतकुमार ऊर्फ प्रवीण यांनी गौरी हत्येचा कट रचल्याचे सुरेशला माहीत होते. तरीही त्याने या दोघांना राहण्यासाठी खोली देऊन हत्येसाठी सहकार्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. 

याआधी अटक करण्यात आलेला नववा संशयित राजेश डी. बंगेरा (वय 50 रा. पालूरू जि. कोडगू)  हा कोडगूच्या विधान परिषद सदस्या वीणा अचैय्या यांचा स्वीय साहाय्यक आहे. याआधी त्याने शिक्षण खात्यात द्वितीय दर्जा साहाय्यक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर जिल्हा पंचायत अधिकारी शेरीन सुब्बैय्या यांचे स्वीय साहाय्यक होता. सरकारी सेवेत रूजू होण्यापूर्वी तो एका संघटनेचा कार्यकता होता. 

सरकारी नोकरी लागल्यानंतर त्याने संघटनेचे काम सोडले. आठवड्यापूर्वी एसआयटी अधिकारी कोडगूमध्ये दाखल झाले. अटकेनंतर राजेशची चौकशी करण्यात आली. गौरी हत्येतील सहभागाची माहिती त्याने दिली असून याबाबतची संपूर्ण माहिती न्यायालयाला बंद लखोट्यात देण्यात आली आहे. पिस्तूल चालविण्यात तो पारंगत आहे. त्याच्याकडे शस्त्र चालविण्याचे दोन परवाने आहेत. त्यानेच वाघमारे, गणेश मिस्कीनला प्रशिक्षण दिल्याचे कबूल केले. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली आहे.

असा लागला सुगावा

पुणे येथील अमोल काळेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून डायरी जप्त करण्यात आली. त्यामध्ये अनेक नोंदी आहेत. सर्व नोंदी कोडवर्डमध्ये असून त्याचे डिकोडिंग करण्यात येत आहे. यामध्ये ‘राजेश सर’ अशी नोंद करण्यात आली होती. त्यानुसार चौकशी करून राजेश डी. बंगेराचा सुगावा मिळाला. राजेश हा अटकेतील संशयितांच्या संपर्कात होता.