Wed, Nov 21, 2018 15:24होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्येत सरकारी क्लार्कचा सहभाग

गौरी लंकेश हत्येत सरकारी क्लार्कचा सहभाग

Published On: Jul 26 2018 1:31AM | Last Updated: Jul 26 2018 1:31AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एका संशयितास कोडगूमधील मडिकेरी येथून अटक केली. राजेश डी. बंगेरा (वय 50) असे संशयिताचे नाव असून, तो शिक्षण खात्यात कारकून आहे. आता या प्रकरणात अटक झालेल्यांची एकूण संख्या 10 झाली आहे. 

काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आलेल्या मोहन नायक याने दिलेल्या माहितीनुसार राजेशला अटक करण्यात आली. सध्या अटकेत असणार्‍या संशयितांकडून मिळालेल्या डायरीत राजेशचा उल्लेख होता. त्यावरून त्याला नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतर त्याला एसआयटीने अटक केली. शिक्षण खात्यामध्ये तो द्वितीय दर्जा सहायक  (कारकून) असल्याचे समजते. 

दरम्यान, संशयितांकडे मिळालेल्या डायरीतील यादीमध्ये गिरीश कर्नाड यांचे नाव पहिल्या स्थानी होते, अशी माहिती एसआयटीने दिली आहे. कर्नाड यांच्यानंतर गौरी लंकेश यांचे नाव होते. पण, कर्नाड यांच्याआधी गौरी यांची हत्या करण्यात आली. अटकेतील संशयित अमोल काळे (वय 34, रा. पुणे) याच्याकडे मिळालेल्या डायरीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील हिंदूविरोधी असणार्‍या 34 महनीय व्यक्तींची नावे होती. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वेगवेगळी यादी होती. कर्नाटकातील यादीत कर्नाड यांचे नाव पहिले होते.