Wed, Jul 24, 2019 06:46होमपेज › Belgaon › गौरी लंकेश हत्या : गावात असूनही होता बेपत्ताच

गौरी लंकेश हत्या : गावात असूनही होता बेपत्ताच

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 12:22AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील संशयितांना भाडेतत्त्वावर घर, पिस्तूल देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला मोहन नायक (वय 53) हा गावातच असला, तरी बेपत्ता होता. 

विशेष पोलिस पथकाने (एसआयटी) त्याच्या मंगळूर जिल्ह्यातील सुळ्या येथील संपाजीमधील घराची तपासणी केली. त्यावेळी महत्त्वाची माहिती मिळाली. मोहनचे मडिकेरी येथे शस्त्रास्त्रांचे दुकान आहे. तो मूळचा शेतकरी आहे. वडील किरकोळ व्यापारी आहेत. मोहन हा आपली पत्नी, मुलांसह संपाजी येथे राहतो. त्याचा मुलगा मडिकेरी पदवीपूर्व कॉलेजमध्ये आहे. मुलगी पाचव्या इयत्तेत आहे. त्याच्या नावे सुमारे 25 एकर जमीन आहे. मजुरांना लावून तो शेती करतो.

जंगलामध्ये त्याचे घर आहे. घरानजीक 100 मीटर अंतरावर पहिले गेट आहे. त्यानंतर 50 मीटर अंतरावर आणखी एक गेट आहे. दुसर्‍या गेटनंतर भुयारसदृष्य मार्ग आहे. त्याच्या घरात सहजासहजी कुणालाच प्रवेश करता येत नाही. त्याच्या घरी काहीजण कंत्राटी पद्धतीवर काम करतात. पण, त्यांना मोहनबद्दल अधिक माहिती नाही. त्याच्या घरी इंग्रजी, कन्नड, हिंदीसह विविध भाषा बोलणारे लोक येत होते. नेहमी तो आपल्या वाहनातून ये-जा करत होता. गावामध्ये असूनही तो नसल्यासारखाच होता, अशी माहिती स्थानिक दुकानदारांकडून मिळाली आहे.

सुमारे 15 वर्षांपासून तो एका संघटनेत सक्रीय होता. वेळोवेळी तो भाषणे करत होता. धार्मिक कार्यक्रमात त्याचा सहभाग होता. कुशालनगरात तो अ‍ॅक्युपंक्चर उपचार करत होता. औषधोपचारासाठी त्याच्याकडे लोक येत असावेत, असा समज स्थानिकांचा होता. अनेकदा तो बंगळूरला जात होता. पण, गौरी हत्येतील संशयितांशी त्याचा संपर्क असल्याची माहिती स्थानिकांना केवळ दोनच दिवसांपूर्वी समजली.

काही दिवसांपासून एसआयटीने त्याच्यावर नजर ठेवली होती. याचा सुगावा त्याला लागला असावा. त्यामुळेच त्याने आपल्या कारच्या नंबरप्लेटवर थोडासा चिखल फासला होता. यामुळे क्रमांक काहीसा अस्पष्ट दिसत होता. त्याच्या अटकेबद्दल कुटुंबीयांना काहीच कल्पना नाही. याबद्दल काहीच माहीत नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.