होमपेज › Belgaon › देहबोलीवरून गणेश अडकला जाळ्यात

देहबोलीवरून गणेश अडकला जाळ्यात

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 26 2018 11:20PMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटकेतील संशयित गणेश मिस्कीन हा त्याचे राहणीमान आणि देहबोलीवरून   विशेष पोलिस पथकाच्या (एसआयटी) जाळ्यात सापडल्याची माहिती मिळाली आहे. 

गौरी लंकेश यांच्यावर आपणच गोळ्या झाडल्याचे सांगणारा संशयित परशुराम वाघमारे याने दिलेल्या माहितीच्या आधारे गणेशला अटक करण्यात आली. गणेशला अटक करण्यापूर्वी एसआयटी अधिकारी हुबळीमध्ये दोन आठवडे तळ ठोकून होते. त्यांनी गणेशवर नजर ठेवून त्याच्या चालण्याच्या, बोलण्याच्या स्टाईलचे हॅण्डिकॅमद्वारे व्हिडिओ बनविले. ते व्हिडिओ वाघमारेला दाखविण्यात आल्यानंतर याबाबतची खात्री करण्यात आली. गणेशकडून मिळालेल्या माहितीनुसार अमित बद्दीला अटक करण्यात आली. 

मंगळुरातील सुळ्या येथे अटक करण्यात आलेल्या मोहन नायकने बंगळुरातील कुंबळगोडी येथे अ‍ॅक्युपंक्चर क्लिनिक सुरू करण्यासाठी खोली भाडेतत्त्वावर घेतली होती. त्या ठिकाणी 3 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी वाघमारे, गणेश, अमित आणि आणखी एक युवक आला. दोन दिवसांनी 5 सप्टेंबरला ते चौघेही तेथून निघून गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एकाच खोलीत चौघेजण असले तरी त्यांना एकमेकांची नावे माहीत नव्हती. केवळ कोडवर्डद्वारे ते एकमेकांशी बोलत होते. वाघमारेला अटक झाल्यानंतर त्याने इतर तिघांची नावे सांगितली नव्हती. त्यांचे चालणे, बोलणे व इतर हावभाव वाघमारेने सांगितले. ते समोर आल्यास ओळखता येईल, असेही वाघमारेने चौकशीवेळी सांगितले. अमोल काळेच्या डायरीत गणेश आणि अमितचे मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर तपासाला गती मिळाल्याचे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले.

हत्या करण्यासाठी गणेश आणि वाघमारे एकाच मोटारसायलवरून गौरी यांच्या घराकडे गेले. अमित आणि आणखी एक संशयित गौरी यांच्या घरापासून 5 कि. मी. दूरवर व्हॅनमध्ये  त्या दोघांची वाट पाहत उभे राहिले. हत्येनंतर गणेश आणि वाघमारे यांनी त्या व्हॅनकडे येऊन तेथेच कपडे बदलले. अमितने वाघमारेकडून पिस्तूल काढून घेतले आणि व्हॅन स्वत: चालवून तो निघून गेला. त्याचवेळी आणखी एक युवक तेथे कारमध्ये आला. त्याने वाघमारेला तेथून दोन दिवस राहिलेल्या खोलीकडे नेले. गणेश हा मोटारसायकलीवरून कारच्या मागोमाग येत होता. तिघेही त्यानंतर कारमधून निघून गेले. एका महिन्यानंतर एक व्यक्ती त्या खोलीकडे आली. तिने मोटारसायकल नेल्याचे समजते.