Wed, Apr 24, 2019 22:01होमपेज › Belgaon › गांजाच्या धुरात गुन्हेगारीची वाट

गांजाच्या धुरात गुन्हेगारीची वाट

Published On: Dec 19 2017 1:56AM | Last Updated: Dec 19 2017 12:59AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

शहरात गांजा विक्रीचे लोण पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनला आहे. गांजाच्या आहारी गेलेल्यांचा वाटमारी प्रकरणात सहभाग असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. शाळा आणि कॉलेज परिसरात होणारी गांजा आणि अंमली पदार्थांची विक्रीदेखील चिंतेची बाब आहे. शहरात गांजा विक्रेत्यांचे जाळे पसरल्याची जोरदार चर्चा असून गांजा तस्करीचे वाढते आव्हान पोलिस खात्यासमोर उभे आहे. 

गेल्या 4 वर्षभरापासून शहरातील गांजाची विक्री वाढली आहे. राजरोसपणे गांजाचा धूर काढण्याकडे तरुणांचा कल दिसून येत आहे. शहरातील विविध पोलिस स्थानकांच्या हद्दीत गांजा विक्रीचे प्रकार वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात मार्केट आणि माळमारुती पोलिस स्थानक हद्दीत अधिक प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची नेहमी चर्चा होती. दरम्यान, उपनगर परिसरात गांजा विक्रेत्यांचे जाळे पसरले आहे.अनगोळ, उद्यमबाग, टिळकवाडी, वडगाव भागातही गांजाचे लोण पसरले आहे. 

शहरातील अनेक तरुण गांजाच्या आहारी गेले असून गांजा सहज उपलब्ध होत असल्याने शाळकरी विद्यार्थीही त्याकडे वळत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. मोक्याच्या ठिकाणी, निर्जनस्थळी,काही शाळा-कॉलेज रस्त्यांवर गांजा विक्री होत आहे. त्याशिवाय काहीजण फिरून गांजाची विक्री करीत आहेत. गांजाची विक्री करणार्‍या दोघांना उद्यमबाग  पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.कोवळ्या वयातील त्या तरुणांना गांजा विक्रीत गुंतविण्यासाठी काही बाहेरच्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे निदर्शनास येत आहे. बेळगाव शहरापासून नजीक असलेल्या काही गावांतून गांजाची आयात केली जात असल्याचे समजते.मिरज भागातूनही बेळगावला गाजा येत असल्याची नेहमी चर्चा असते. शहरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात गांजा पिकविला जात आहे.

काही महिन्यांपूर्वी खंजर गल्ली येथील नागरिकांनी गांजा विक्री करणार्‍यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी गांजा विक्रत्यांविरोधात मोहीम हाती घेतली.पोलिसांच्या मोहिमेनंतर काहीकाळ गांजा विक्रीला आळा बसला. परंतु गेल्या दोन महिन्यात पुन्हा गांजा विक्रीचे प्रकार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांत शहर परिसरात वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत.वाटमारी प्रकरणात गांजाच्या आहारी गेलेल्यांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या महिनाभरात शहरात दहा जणांवर गांजा विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून विक्रेत्यांवर कारवाई होत असली तरी या प्रकारांना आळा बसत नसल्याने पोलिस खातेही बुचकळ्यात पडले आहे. गांजाची तस्करी वाढत असल्याने पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे.  

पालकांच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी
शहरातीलच नाही तर ग्रामीण भागातील तरूणही गांजा आणि अमंली पदार्थाकडे वळत आहेत. दारुच्या तुलनेत गांजाचा डोस स्वस्तात मिळत असल्याने त्याकडे तरुणांचा कल अधिक असल्याचे दिसून येत आहे. तरुण नशेच्या आहारी जात असताना पालकांच्या डोळ्यावर मायेची पट्टी दिसत आहे.

चोरी-वाटमारी आणि गांजा
तरुणाई गांजाच्या आहारी जात असल्याने त्यांना त्याची चटक लागली आहे. त्यासाठी पैसे मिळत नसल्याने तरूण चोर्‍या करण्याकडे वळत आहेत.  शहरातील चोरीच्या घटनांत वाढ झालीआहे. नशेत राहणार्‍या तरुणांकडून मारामारीचे प्रकार घडत आहेत.चार वर्षांपूर्वी गांजा विक्री प्रकरणातूनच अनगोळातील युवकाचा खून झाला होता. गांजाच्या आहारी गेलेल्या काहींनी आता वाटमारीचा धोकादायक मार्ग धरल्याची चर्चा आहे.