Fri, Apr 26, 2019 09:22होमपेज › Belgaon › शहीद संतोष गुरव अमर रहे!

शहीद संतोष गुरव अमर रहे!

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 12:30AMखानापूर : प्रतिनिधी

‘जब तक सूरज चाँद रहेगा, संतोष तेरा नाम रहेगा’, ‘अमर रहे, अमर रहे, संतोष गुरव अमर रहे’, ‘वीरपुत्राला सलाम!’ या घोषणांचा अखंड गजर करत हजारोंचा जनसमुदाय आणि सतत बरसणार्‍या वरुणराजाच्या साक्षीने हुतात्मा शहीद संतोष लक्ष्मण गुरव यांना बुधवारी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.हलगा, हलशी, नंदगड परिसरासह खानापूर तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून जमलेल्या पाच हजारांवर तरुण, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांच्या उपस्थितीने हलगा गावात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. दुपारी दीड वाजता शासकीय इतमामात संतोष यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील लक्ष्मण गुरव यांनी भडाग्नी दिला.

पहाटे गोवामार्गे पार्थिव सकाळी 9 वाजता खानापुरात दाखल झाले. तत्पूर्वी, तहसीलदार शिवानंद उळागड्डी आणि पोलिस निरीक्षक गुरुनाथ यांनी खानापूर तालुक्याच्या सीमेवर जाऊन शासकीय मानवंदना देत पार्थिव खानापूरला आणले. शिवस्मारक चौकात शहरातील नागरिकांनी अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. तेथून नंदगडमार्गे पार्थिव हलग्याला नेण्यात आले.गावाच्या प्रवेशद्वारापाशी सैन्य दलाचे वाहन येताच ग्रामस्थांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून फेरी काढण्यात आली. ज्या शाळेत संतोष गुरव यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, त्या हलगा मराठी शाळेच्या पटांगणावर अंत्यदर्शनासाठी शामियाना उभारण्यात आला होता. यावेळी संतोष गुरव यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिक व महिलांची एकच रीघ लागली होती. 

शासकीय इतमामात संतोष गुरव यांच्यावर हलगा येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी सीआरपीएफ कोब्रा स्कूलचे डीआयजी संजीवकुमार थापा, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी, जि. पं. सीईओ आर. रामचंद्रन, प्रांताधिकारी कविता योगप्पनवर, उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, गुरुनाथ यांच्यासह माजी आ. दिगंबर पाटील, माजी आ. अरविंद पाटील, प्रकाश चव्हाण, संजय कुबल, चेतन मणेरीकर, पंडित ओगले, मुरलीधर पाटील, परशराम पुजारी, गोविंदराव किरमटे, गोपाळ पाटील, विठ्ठल पाटील, डी. एम. गुरव आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

अरविंद पाटील, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर, हलगा ग्रामस्थांच्यावतीने रणजीत पाटील आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. नंदगड, हलशी येथील शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अंत्यदर्शन घेऊन मानवंदना दिली. शासनाकडून उपलब्ध असणार्‍या सर्व सोयी शहीद संतोष यांच्या कुटुंबियांना मिळवून देण्याची ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली. संतोष यांचे योगदान भावी पिढीला कळावे, यासाठी गावात शहीद स्मारकाची उभारणी करण्याची घोषणा विठ्ठल हलगेकर यांनी केली.

सारेच गहिवरले !

शहीद संतोष यांची पत्नी राजश्री, आई रामाक्‍का आणि तिन्ही बहिणींनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. भावनाविवश प्रसंगाने सार्‍यांच्याच अश्रूचा बांध फुटला. संतोष यांच्या निधनाची बातमी समजल्यापासून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला.