होमपेज › Belgaon › लग्न जुळेना म्हणून तो बनला पीएसआय

लग्न जुळेना म्हणून तो बनला पीएसआय

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 27 2018 11:15PMबेळगाव ः प्रतिनिधी

उपनिरीक्षक असल्याचे सांगून तरुणींना फसविण्याचा प्रयत्न करणार्‍या तोतया पीएसआयला उद्यमबाग पोलिसांनी गुरुवारी अटक केली. योगेश्‍वर शिवबसव काळे (वय 30. रा. उगारखुर्द, ता. अथणी) असे त्याचे नाव आहे. 

वधूच्या शोधात असलेल्या सदर तोतया पोलिसाने शादी डॉट कॉम या विवाह जुळविणार्‍या वेबसाईटवर पीएसआय वर्दीतील फोटो अपलोड केला होता. आपण पीएसआय आहोत, असे भासवून विवाह जुळविण्याच्या तयारीत सदर तरुण होता. तसेच मुलीच्या पालकांनाही जाळ्यात ओढून फसवेगिरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे तपासातून पुढे आले आहे. मात्र, याबाबत कोणत्याही पोलिस स्थानकात तक्रार नोंद झालेली नाही. उद्यमबाग पोलिसांनी सापळा रचून सदर तोतया पोलिसाला अटक केली आहे. 

पोलिस उपनिरीक्षक असल्याचे सांगून सदर युवक उद्यमबाग पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत वावरत होता. त्याने घातलेल्या गणवेषावर आयपीएस असा उल्लेख होता. या भागातील काही नागरिकांनी सदर युवकाच्या हावभावावरून संशय आल्याने याची माहिती उद्यमबाग पोलिसांना दिली होती. यावरून उद्यमबाग पोलिसांनी सापळा रचून सदर युवकाला अटक केली आहे. सुभाषचंद्र नगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे. 

त्याच्याकडून मोबाईल फोन व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून उद्यमबाग पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.