Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Belgaon › चार पुरोगामींच्या हत्येचा कट एकाच दिवशी होता

चार पुरोगामींच्या हत्येचा कट एकाच दिवशी होता

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी ज्येष्ठ पत्रकार गौरी यांच्या हत्येनंतर एकाच दिवशी चार पुरोगामींच्या  हत्यांचा कट संशयितांनी आखला होता. मास्टरमाईंड अमोल काळे याच्याकडून जप्‍त करण्यात आलेल्या डायरीत ‘एकही दिन चार अधर्मियोंका विनाश’, असे वाक्य लिहिलेले आहेत. एसआयटीच्या चौकशीत याबाबतची माहिती उघड झाली आहे.

साहित्यिक के. एस. भगवान, अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड, नरेंद्र नायक, निडुमामिडी मठाचे वीरभद्र चन्‍नमल स्वामी या चार पुरोगामींच्या नावांचा समावेश आहे. गौरी हत्येतील 12 संशयित एसआयटीच्या अटकेत असले, तरी त्यांच्या साथीदारांकडून पुरोगामींची हत्या करण्याची शक्यता असल्याने संबंधितांना पोलिस सुरक्षा देण्यात आली होती. सध्या या पुरोगामींना सुरक्षा नाही. प्रा. भगवान आणि कर्नाड यांनी तर सुरक्षा नाकारलीच आहे.

पुणे-चिंचवडच्या अमोल काळेला अटक केल्यानंतर त्याच्याकडून डायरी जप्‍त करण्यात आली होती. त्यामध्ये कोडवर्डमध्ये माहिती लिहिण्यात आली होती. अनेकांचे संपर्क क्रमांक आणि विविध माहिती त्यामध्ये होती. त्याचे तज्ज्ञांकडून डिकोडिंग करण्यात येत असून, महत्त्वपूर्ण माहिती एसआयटीला मिळाली आहे.

चार पुरोगामींच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी काळेने काही जणांना नियुक्‍त केले होते. एकाचवेळी हत्या करण्यासाठी संशयित नवीनकुमार आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेला सुधन्वा गोंधळेकर  याच्याकडे पिस्तुलांची मागणी केली होती.करण्यात आलेला सुधन्वा गोंधळेकर याच्याकडे पिस्तुलांची मागणी केली होती.

काळेची डायरी

डायरीत कोडवर्डमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार गौरी यांच्या हत्येपुढे ‘बिल्डर’ असे नाव लिहिले होते. बिल्डरचा संपर्क क्रमांक डायरीत आढळून आल्यानंतर परशुराम वाघमारेला अटक करण्यात आली. नरेंद्र नायक यांच्या नावापुढेही ‘बिल्डर’ असे नाव लिहिले होते. याचा अर्थ नायक यांच्या हत्येची जबाबदारीही वाघमारेवर होती. प्रा. भगवान यांच्या हत्येसाठी अनिल नामक युवकाची निवड करण्यात आली होती. त्याला एअरगन अणि पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. नवीनकुमार त्याला भेटून प्रशिक्षणाबाबत विचारपूस करत होता. बसून आणि झोपून गोळी चालविण्याचे प्रशिक्षण घेण्याची सूचना त्याने केली होती. आपला वापर हत्येसाठी करण्यात येणार असल्याची कल्पना अनिलला नव्हती. त्यामुळे एसआयटीने त्याला अटक न करता साक्षीदार बनविले. दरम्यान, डायरीतील लिखाण काळेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या हस्ताक्षराचे नमुने घेऊन याबाबतची खात्री करण्यात आली आहे.

त्यांनाही प्रशिक्षण चिखलेतच

कर्नाड यांचे नाव ‘काका’ निडुमामिडी वीरभद्र स्वामींचे नाव ‘स्वामी’असे ठेवण्यात आले होते. त्यांच्या हत्येसाठी दोघा युवकांची निवड काळेने केली होती. त्या दोघांनाही बेळगावातील भरत कुरणेच्या शेतात पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

डायरीतील कोडवर्ड

गिरीश कर्नाड ‘काका’, निडुमामिडी मठाचे मठाधीश ‘स्वामी’, गौरी लंकेश ‘अम्मा’, परशुराम वाघमारे ‘बिल्डर’, भरत कुरणे ‘माटर’, गौरी यांचे घर ‘गोशाळा’ पिस्तूल परत करणे ‘बॉक्स ट्रान्स्फर’, पुरोगामींच्या वर्तणुकीवर नजर ठेवणे ‘अभ्यास’असे कोडवर्ड डायरीत वापरण्यात आले. अमोल काळे ‘भाईसाब’, निहाल ‘दादा’, राजेश डी. बंगेरा ‘सरफ ’असे कोडवर्ड वापरण्यात येते होते.