Sun, Jun 16, 2019 02:16होमपेज › Belgaon › अपुरे कर्मचारी....जंगलाचे नुकसान

अपुरे कर्मचारी....जंगलाचे नुकसान

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खानापूर : तालुक्यात वन कर्मचार्‍यांच्या अपुर्‍या मनुष्यबळामुळे जंगलाचे नुकसान होत आहे. ठिकठिकाणी होणारी लाकडांची चोरी, जंगलात पेटणारे वणवे कमी करण्यात वनखात्याला अपयश आले आहे. अपुर्‍या मनुष्यळामुळेच या समस्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यात अद्याप 50 वन बिटगार्डच्या जागा रिक्त आहेत.

तालुक्यात जंगलक्षेत्र मोठे असल्याने वनखात्याची यंत्रणा सक्रिय असणे गरजेचे आहे. त्या मानाने या ठिकाणी कोणत्याच व्यवस्था नाहीत. यात अपुर्‍या मनुष्यबळाची समस्या मोठी आहे. मनुष्यबळाअभावी जंगलाचे संरक्षण, उद्भवणार्‍या समस्यांचे वेळेत निवारण होणे मुश्किल बनले आहे. यामुळेच जंगलात वणवे आणि लाकडांची चोरी वाढली आहे. अज्ञातांकडून वणवे लावले जात असल्याने जंगलाच्या नुकसानीबरोबर वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याची माहिती 
अधिकार्‍यांनी दिली. 

तालुक्यातील  वनक्षेत्राचे रक्षण करण्यासाठी पंचायतीत दोन ते तीन बिट गार्ड कार्यरत असणे गरजेचे आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात अद्याप 50 कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. त्या त्वरित भरण्याची मागणी होत आहे.

खानापूर : वार्ताहर

असोगा येथील रामलिंगेश्‍वर देवस्थानजवळील वनातील बांबू पूर्णपणे वाळले असल्याने आगीचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांचे नुकसान संभवते. 
देवस्थानच्या मालकीची जवळपास चारशे एकर जंगलजमीन असून यामध्ये विविध जंगली झाडांसह मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड करण्यात आली आहे.  देवस्थानावर  प्रशासक नेमला आहे. त्यांचे वनाकडे दुर्लक्ष होत आहे.  

पूर्वी ही जमीन 25 वर्षाच्या करारावर दांडेली पेपर मिलला देण्यात आली होती. मिल त्या जमिनीमध्ये बांबूची लागवड करून प्रत्येक तीन ते चार वर्षाला वाढलेले बांबू घेऊन जात असे. पण 25 वर्षाचे लीज संपल्यावर चारशे एकर जंगलजमीन रामलिंग देवस्थानने ताब्यात घेतली. त्यावेळी असोगा गावची ट्रस्ट कमिटी मंदिराचे व्यवस्थापन पाहत होती. बांबूपासून देवस्थानला मोठे उत्पन्न मिळू शकते. काही वर्षापूर्वी देवस्थान ट्रस्टीनी बांबू तोडण्यास प्रारंभ करून त्याची विक्रीदेखील सुरू केली. पण गावातील काहींनी बांबू विक्री व्यवहाराबद्दल संशय व्यक्त करुन वनखाते व जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली. वनखात्याने बांबूतोड तातडीने थांबविली. जिल्हा प्रशासनाने मंदिर ट्रस्टकडील व्यवस्थापनाचा कार्यभार काढून प्रशासक नेमला. तेव्हापासून या वनक्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे.


  •