Sat, Jul 20, 2019 02:23होमपेज › Belgaon › जनावरांना होणार टँकरने पाणीपुरवठा

जनावरांना होणार टँकरने पाणीपुरवठा

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 11:23PMबेळगाव : प्रतिनिधी

तीन वर्षे जिल्ह्यातील अनेक भागांत अवर्षणाने ठाण मांडले आहे. यामुळे आतापासूनच भविष्यात उद्भवणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहे. जूनअखेर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर झाल्यास जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी पशुसंगोपन खात्याने पुढाकार घेतला असून आराखडा तयार करण्यात येत आहे.

पिण्याच्या पाण्याची समस्या जिल्ह्यातील अनेक भागांत एप्रिलनंतर सुरू होते. त्या ठिकाणी महसूल विभाग आणि जिल्हा पंचायतच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. हे चित्र कायमचे आहे. परंतु, यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील जनावरांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

जनावरांसाठी जूनपर्यंत पाणी उपलब्ध असते. त्यानंतर तलाव, धरणे पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडतात. या काळात जनावरांचे हाल होतात. अनेक भागांत जनावरे दगावतात. तहानेने व्याकुळ झालेल्या जनावरांना आधार देण्यासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. जनावरे असणार्‍या कुटुंबाना प्रत्येक जनावराला 60 लि. पाणी पुरविण्याचा प्रयत्न पशुसंगोपन खात्याकडून करण्यात येणार आहे.

एका जनावराला किमान 60 लि. पाण्याची आवश्यकता असते. दररोज किमान तीनवेळा पाणी देणे गरजेचे असते. प्रत्येकवेळी 20 लि. पाणी पाजण्यात येते. उन्हाचा ताप वाढेल त्याप्रमाणे जनावरांची तहान वाढत जाते. वेळेत पाणी न मिळाल्यास जनावरांची किडनी खराब होण्याचा धोका असतो. उष्मा वाढल्यास जनावराचा मृत्यू संभवतो.

बकरी, शेळी यांना दररोज किमान 3 लि. पाण्याची गरज भासते. मात्र, बकरी, शेळी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्यांना पाणी पुरविणे अवघड आहे. 
जिल्ह्यात एकूण 14 लाख जनावरे आहेत. रायबाग, चिकोडी तालुक्यातील बहुतेक गावे, सौंदत्ती, गोकाक, बैलहोंगल तालुक्यांत काही गावांतील जनावरांना पाणी, चार्‍याची टंचाई जाणवते. 

चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी भागात पाणी, गवत याची सतत कमतरता असते. अशा भागासाठी वेगळी योजना आखण्यात येणार आहे. 

चार्‍याची कमतरता नाही

जिल्ह्यात सध्या 9.27 लाख टन  चारा उपलब्ध आहे. येत्या चार महिन्यांसाठी आवश्यक चारासाठा जिल्ह्यात आहे. यामुळे चार्‍याची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी आहे. पशुसंगोपन खात्याकडून चारासाठा करण्यात येत आहे. छावण्या सुरू केल्या तरी चारा कमी पडण्याची शक्यता कमी आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, animals, water supply,