Sat, Apr 20, 2019 16:03होमपेज › Belgaon › म्हादईवर पहिला हक्‍क खानापूरकरांचाच !

म्हादईवर पहिला हक्‍क खानापूरकरांचाच !

Published On: Dec 22 2017 1:25AM | Last Updated: Dec 21 2017 11:40PM

बुकमार्क करा

खानापूर : प्रतिनिधी

म्हादईप्रश्‍नी कर्नाटक आणि गोवा यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झालेला असताना म्हादईचे उगमस्थान ज्या खानापूर तालुक्यात आहे तेथील जनतेचे कोणालाच सोयरसुतक नसल्याचे दिसते. म्हादई नदीच्या जलस्रोतांवर खानापूर तालुक्यातील जनतेचा पहिला हक्क आहे. मात्र या जनतेच्या भविष्यातील पाणीटंचाई निवारणार्थ दोन्ही बाजूंना काडीचीही फिकीर नसल्याने खानापूरकरांची अवस्था अनाथ पोरासारखी झाली आहे.

म्हादई जलहक्कावरून गोवा आणि कर्नाटकात 12 वर्षापासून जुंपली आहे. गोव्यात मांडवी या नाव्याने ओळखली जाणारी म्हादई खानापूर तालुक्यातील देगावनजीकच्या जंगलात उगम पावते. पात्र खानापूर तालुक्यात लहान असले तरी ते जसजसे गोव्याच्या दिशेने जाते, तसे रुंद होत गेले आहे. म्हादई गोव्यात खाडीला जाऊन मिळते. उसगाव, तिस्क, वाळपईच्या जनतेला या पाण्याचा मोठा वापर होतो.

एका अहवालानुसार म्हादईच्या खोर्‍यात अंदाजे 200 टीएमसी पाणी प्रकल्पाअभावी वाया जाते. 45 टीएमसी पाण्यावर कर्नाटकाने आपला हक्क सांगत साडेसात टीएमसी पाणी वळविण्याची योजना आखली आहे. मूळ म्हादई प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील वनसंपत्तीचे प्रचंड नुकसान होणार होते. त्यामुळे मूळ प्रकल्पाचे स्वरूप बदलून कळसा-भांडुरा नावाने कर्नाटकाने नवी योजना बनवली. त्यानुसार शेतीऐवजी हुबळी-धारवाडमधील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गरज पुढे केली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादासमोर हा प्रश्‍न प्रलंबित आहे.

भाजपसह सर्वच पक्षांनी म्हादईच्या माध्यमातून राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, हेच पाहिले आहे. आगामी निवडणुकीकरिता भाजपला कर्नाटकात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी घेतलेला म्हादईसाठीचा पुढाकार निव्वळ धूळफेक आहे.   खानापूर तालुक्यात एकही पाणीयोजना अस्तित्वात नाही. ही वस्तुस्थिती आहे. शहर आणि तालुक्याची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असताना जनतेला उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जांबोटी-कणकुंबी भागातील आमगाव, चिखले, मान, पारवाड, वडगावसारख्या पश्‍चिम घाटाच्या चक्क पायथ्याशी वसलेल्या गावांनाही चार-पाच वर्षापासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. असे असताना केवळ हुबळी, धारवाड, नवलगुंद, नरगुंदच्या जनतेची तहानच सर्वांना महत्त्वाची वाटते.

स्थानिकांचा या पाण्यावर पहिला हक्क असून त्यांच्यासाठी ठोस योजनांचा विचार करून मगच अन्य भागातील जनतेचा विचार करावा. खानापूरवर आपला हक्क सांगणार्‍या कर्नाटकाला त्याच न्यायाने इथल्या जनतेचे दु:ख दिसत नाही का, असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.