Wed, Mar 20, 2019 22:53होमपेज › Belgaon › आधार कार्ड तयार करताना बोटांच्या ठशांची अडचण!

आधार कार्ड तयार करताना बोटांच्या ठशांची अडचण!

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 9:01PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

एकीकडे केंद्र सरकार आधार कार्ड अनेक महत्त्वाकांशी योजनांना जोडण्याची सक्ती करत आहे. तर दुसरीकडे काहींच्या बोटांचे ठसे गुळगुळीत झाल्याने समस्या निर्माण होत आहे. गुळगुळीत झालेल्या बोटांमुळे आधारकार्ड न मिळणार्‍या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.  

बेळगाव शहरात अनेक आधार कार्ड केंद्रे आहेत. यातील बहूतांश केंद्रात आधार कार्ड बनविताना ही समस्या उद्भवते. अनेकांचे फिंगरप्रिंट व्यवस्थित होत नाही. यामुळे आधार कार्ड काढायचे कसे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. अशा नागरिकांना अनेक व्यवहार करताना  अडचणी येत आहेत. 

अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे घासले गेले आहेत. त्यामुळे त्यांना हेलपाटे काढावे लागत आहेत. तुमचे फिंगरप्रिंट नसल्याने तुम्हाला आधारकार्ड मिळणार नाही, असे सांगून केंद्रातून परत पाठविले जात आहे. यावर केंद्र सरकारने कोणत्याच ठोस उपाययोजना आखल्या नाहीत. याचा नाहक त्रास सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. याचबरोबर नवीन सीमकार्ड घेताना देखील फिंगरप्रिंटची गरज असते. अशावेळी हाताचे गुळगुळीत ठसे अडचणीचे ठरत आहेत.   

बहूतांश वृद्ध नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत असून यासाठी केंद्र शासनाने ठोस उपाययोजना करून वेगळी कार्यप्रणाली सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. जेणेकरून अनेकांना होणारा त्रास कमी होईल. शहरात तहसीलदार कार्यालय बेळगाव वन, विश्‍वेश्‍वरय्या नगर व कला मंदिर आदी ठिकाणी आधार कार्ड बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे.