Mon, Jan 21, 2019 15:11होमपेज › Belgaon › रोहिणीचा पेरा... मोत्याचा तुरा !

रोहिणीचा पेरा... मोत्याचा तुरा !

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 8:28PMखानापूर : प्रतिनिधी

मृग नक्षत्रापासून खर्‍याअर्थाने मान्सूनचे आगमन होत असले तरी रोहिणी नक्षत्रात केलेला बियाणाचा पेरा हा शेतकर्‍यासाठी मोत्याचा तुरा ठरतो. अशी परंपरागत धारणा शेतकर्‍यांच्या मनात आहे. या नक्षत्रात केलेली भातपेरणी सुगीपर्यंत सगळेच चांगले हंगाम देते. परिणामी भरघोस पिकासाठी शेतकर्‍याचे सर्वाधिक पसंदीचे नक्षत्र असल्याने या काळात शिवारांना गावाचे स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.

रोहिणी नक्षत्रातील पेरणी फलदायी ठरते. त्याशिवाय पुढील वर्षीच्या हंगामालाही वेळेत सुरुवात करता येते. त्यामुळे हा पेरा साधण्यासाठी शेतकर्‍यांनी शिवारे फुलून गेली आहेत. धूळवाफ पेरण्यांनादेखील रोहिणी नक्षत्रावरच सुरुवात केली जाते. पेरणीसाठी शिवारे तयार करुन दर्जेदार बियाणांची जुळवाजुळव करुन पेरणीचा हंगाम साधण्यासाठी बळीराजाची शिवारांमध्ये भल्या पहाटेपासून एकच धांदल सुरु आहे. भात आणि भुईमूग पेरणीसाठी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून ज्याठिकाणी गेल्या आठवड्यात पावसाने बर्‍यापैकी साथ दिली आहे. अशाठिकाणी पेरणीची कामेही पूर्णत्वास आली आहेत. तालुक्यात 50 हजार हेक्टर इतके लागवडीखालील कृषीक्षेत्र आहे. त्यामध्ये 73 टक्के भातपिकाची लागवड केली जाते. 80 टक्के भाताची पेरणी केली जाते. तर 20 टक्के जमिनीत लावणीद्वारे भातलागवड होते. यावर्षी समाधानकारक व हंगामशीर पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने कृषीखात्याने 44 हजार हेक्टर इतके भातलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्याशिवाय ऊसलागवडीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता असल्याने भातलागवडीचे क्षेत्र वाढेल, असा कृषी खात्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने वाढीव क्षेत्र गृहित धरुन कृषविभागाने काटेकोर नियोजन केले आहे.

ओलावा असणार्‍या जमिनीच्या शिवारात धुळवाफ पेरणीचे प्रमाण अधिक असते. वळिवाच्या पावसाच्या भरवशावर मशागत करुन शेतकरी बियाणे पेरणी करतो. रोहिणी नक्षत्रात पडणारा वळीवाचा पाऊस आणि त्यानंतरचा मृगाचा मुबलक पाऊस यामुळे पिकाची उगवण चांगली होते. गोवर आणि खतांचे योग्य प्रमाण साधत केलेली रोहिणी नक्षत्रातील पेरणी चांगले पीक देते. असाही शेतकर्‍यांचा आजवरचा अनुभव आहे. परिणामी ट्रॅक्टर, बैलजोडी आणि माणसांच्या गर्दीने शिवारे फुलून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. वळिवाने आणखी चार दिवस उघडीप दिल्यास शंभर टक्के भातपेरणी पूर्ण होऊ शकते.