Tue, May 26, 2020 01:29होमपेज › Belgaon › ‘सुगी’ पर्वात बळीराजा दंग

‘सुगी’ पर्वात बळीराजा दंग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : नागेंद्र मधाळे

देवावाणी शेत माझं नवसाला पावलं,
कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं !
किंवा
भलरी दादा भलगडी दादा,
भलरी दादा भरली!

अशी शेतकरी गीतं कानावर पडू लागली की बळीराजा सुगीच्या पर्वात रमला आहे, असे समजले जाते. काढणी करताना कंटाळा येऊ नये आणि शीण घालविण्यासाठी लोकगीत शेतकरी म्हणत. आता अशी लोकगीतं आणि शेतकरी गीतं ऐकायला दुर्मीळ होत सली तरी अशी गाणी ऐकताच  दिवस आठवतात ते सुगीचे!

ऑक्टोबरपासून बळीराजाला वेध लागतात ते सुगीचे! पूर्णांगाने पोटरी भरलेल्या पिवळ्याधमक रंगातील भाताची शेती वार्‍यासंगे डौलाने डोलत असते. हवामानात थोडीशी नरमाई आली की भाताची पोटरी भरू लागतात. नोव्हेंबरपासून कापणीसाठी बळीराजा आतूर होतो वसुगीला सुरुवात होते.

पाखरांपासून आणि जंगली जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी व पीक जपण्यासाठी शेतकरी शेतात बुजगावणी उभी करतात. एक -दोन दिवसात कापणी झाली की वातावरण पाहून मळणी करतात आणि कुणी बैलगाडीतून तर कुणी ट्रॅक्टरमधून पोती घराकडे आणली जातात.  घर आनंदाने न्हावून जाते. घरी आल्यानंतर पहिल्या बैलगाडीचे अथवा ट्रॅक्टरचे औक्षण केले जाते. नंतर पोती घरात रचून, थप्प्या करून ठेवल्या जातात. सध्या असे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. बेळगाव तालुका परिसरात सध्या भाताची कापणी आणि मळणीला जोर आला आहे. भात कापणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी ऐन दिवाळीतही कापणी व झोडपणीच्या कामात मग्‍न होता. 

कापणीसह सुगीच्या कामांसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे.   कापणी करून गवत व भात दोन दिवस गुंडाळून वाळवत ठेवून लगेच झोडणी केल्यामुळे मनुष्यबळ कमी लागत असल्याचे शेतकरी सांगतात. मजूर मिळत नसल्याने संपूर्ण कुटुंबच शेतात कामात दिसते. भाताच्या लोंब्यातील एकेक दाणा गोळा करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात.