Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांवरचाही ताण व्हावा कमी

शेतकर्‍यांवरचाही ताण व्हावा कमी

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 11:18PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव-खानापूर-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग खानापूरपर्यंत चौपदरी आणि त्यापुढे गोव्याच्या हद्दीपर्यंत दुपदरी असणार आहे. मात्र त्यातील सर्वांत वादग्रस्त भाग असेल तो हलगा-मच्छे बायपास रस्त्याचा. या बायपाससाठी शेतजमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. बायपामुळे शहरातील रस्त्यांवरचा 60 टक्के भार घटणार आहे. मात्र, शेतकर्‍यांवरचाही ताण कमी व्हावा, अशीच अपेक्षा बायपासग्रस्तांची आहे.बेळगाव-खानापूर रस्ता चौपदरी झाल्यास या रस्त्यावरची वाहतुकीची कोंडी आपसूक कमी होईल. सध्या हा रस्ता दुपदरी आहे. मात्र दुभाजक नसल्याने सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. तो चौपदरी करण्याची गरज आहेच.

तर हलगा-मच्छे बायपास रस्ता बांधून बेळगाव-खानापूर-पणजी आणि पुणे-बंगळूर हे दोन महामार्ग एकमेकांशी जोडले जातील. त्यामुळे एका महामार्गावरची वाहने परस्पर दुसर्‍या महामार्गावर जाऊ शकतील. त्यांना शहरात येण्याची गरज भासणार नाही. तसे झाल्यास शहरातील रस्त्यांवरचा सुमारे 60 टक्के भार कमी होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.  सध्या एका महामार्गावरून दुसर्‍या महामार्गावर जाण्यासाठी शहरातून जावे लागते. अवजड वाहने खासबाग-वडगावातून जातात. तर कार-मोटारी शहरातून जातात. परिणामी शहरातील रस्त्यांवर वारंवार कोंडी  होते.

बायपासचा वाद

हलगा-मच्छे हा साडेनऊ कि.मी.चा बायपास रस्ता शेतजमिनीतून जातो. या शेतीतून भात,  हरभरा-चणा आणि भाजीपाला अशी तीन पिके घेतली जातात. त्यामुळेच जमीन देण्यास शेतकर्‍यांचा विरोध  आहे.

2011 पासून प्रशासन आणि शेतकर्‍यांमध्ये संघर्ष सुरू असून दोन वेळा सर्वे अधिकार्‍यांना शेतकर्‍यांनी पिटाळून लावले होते. मात्र शेतकर्‍यांना भरपाई देण्यास सरकार तयार असून, ती शेतकर्‍यांनी स्वीकारावी, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

गोवा हद्दीपर्यंत बेळगाव-गोवा महामार्गाचा 82 कि.मी. टप्पा दोन वर्षांत पूण4 केला जाईल. हा रस्ता हलग्यापासून सुरू होईल. तो गोवा हद्दीपर्यंत बनवला जाईल. हा रस्ता बांधण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे.

Tags : Halga Machhe, bypass, road, issue