होमपेज › Belgaon › पीकविमा योजनेकडे शेतकर्‍यांची पाठ

पीकविमा योजनेकडे शेतकर्‍यांची पाठ

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 07 2018 10:31PMबेळगाव : प्रतिनिधी

नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या पीक विमा योजनेला यावर्षी मागील वर्षापेक्षा कमी प्रतिसाद लाभला आहे. यावर्षी 40 हजारने घट झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या 
कर्जमाफीमुळे शेतकर्‍यांनी पीकविम्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान फसल बीमा योजना सुरू केली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकासाठी सदर योजना लागू आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येत आहे. परंतु, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विम्याबाबत अनास्था दाखविली आहे. विमा करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत होती. त्यानंतर आकडेवारी उपलब्ध झाली असून यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकर्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

राज्यात मागील वर्षी 17 लाख शेतकर्‍यांनी पीक विमा केला होता. यामध्ये यावर्षी घट झाली असून 10 लाख 73 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा केला आहे. बेळगाव जिल्ह्याच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद लाभला असून केवळ 40 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा केला आहे.

राज्यात सध्या शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकर्‍यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. यामुळे राज्य कृषी अधिकार्‍यांकडून मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, केंद्राकडून त्याला अद्याप प्रतिसाद लाभलेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वाधिक पीक विम्याला गदग जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी एक लाख शेतकर्‍यांनी विमा केला आहे. सर्वात कमी यादगिर जिल्ह्यात लाभला आहे. या ठिकाणी केवळ 13 हजार शेतकर्‍यांनी पीक विमा केला आहे.