होमपेज › Belgaon › असला नवरा नको ग बाई...

असला नवरा नको ग बाई...

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 10:27PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सध्या सगळीकडे विवाह  जुळविण्याच्या कार्याला गती आली आहे. मात्र मुलगा आणि मुलगीच्या अपेक्षा वाढल्या असून सरकारी नोकरीला प्राधान्य दिले जात आहे. मुलगा शिक्षित तसेच स्वतःचा व्यवसाय हवा, अशा मागण्या केल्या जात आहेत. शेतकरी मुलांकडे दुर्लक्ष करण्यात येत असून असला नवरा नको गं बाई म्हणून नाके मुरडण्यात येत आहेत. 

डिसेंबर सुरु असून यावर्षीच्या लग्नसराईला सुरुवात झाली आहे. अशातच उपवर मुलामुलींसाठीही वधू-वर सूचक केंद्रांमध्ये नोदणी करण्याचीही लगबग सुरु आहे. लग्नासाठी इच्छुक मुलींकडून सैन्यदल, सरकारी नोकरदार मुलांला पसंती दिली जात असल्याचे चित्र शहरी भागासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. 

शेतकरी, ड्रायव्हर, गवंडी, कंपनी तसेच इतर खासगी व्यवसायातील नवरा नको असा सूर वधूपक्षांकडून आळवला जात आहे. शहरातील नव्वद टक्के मुली या ग्रामीण भागातील मुलांना नापसंती दर्शवितात. याप्रमाणे ग्रामीण भागातील मुलींचा मात्र काही अंशी शहराकडे कल दिसून येत आहे. मात्र, वराच्या नोकरी व व्यवसायालाही अधिक महत्व दिले जात आहे.