Fri, Apr 26, 2019 04:08होमपेज › Belgaon › आता वेध गणेशोत्सवाचे... 

आता वेध गणेशोत्सवाचे... 

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 8:34PMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह अवघ्या बेळगावमधील लोकप्रिय असलेला गणेशोत्सव  चार महिन्यावर येऊन ठेपला आहे. एकीकडे गणेश कार्यशाळांमध्ये गणपती बनविण्यासाठी मूर्तिकार मग्‍न आहेत. शिवजयंती उत्सव पार पडला असून शहरवासियांना आता वेध लागले आहेत ते गणपती बाप्पांच्या आगमनाचे. चार महिन्यावर गणेशचतुर्थीचा उत्सव आल्याने मूर्ती बनविणे व रंगकामाला गती आली आहे. यंदा 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. 23 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. मूर्तिकारांनीही आतापासून कामाला गती दिली आहे.                                                                                   

बाप्पांचे रम्य रूप साकरण्यासाठी मूर्तिकार तल्लीन होऊन काम करत आहेत. डोळे आखणे, बाप्पांच्या दागिन्यांची सजावट करणे, पितांबर नेसवणे, रंगकाम आदी काम हातावेगळे केले जात आहे. वळीवाने बर्‍याच वेळा हजेरी लावली आहे. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी मूर्ती बनविणे, रंगकाम करण्यासाठी लगबग चालवली आहे. रंगकाम केल्यानंतर मूर्ती सुकण्यासाठी उन्हात ठेवली जात आहे. यासाठी चार महिने आगोदरच मूर्तिकारांनी मूर्ती बनविण्याच्या कामाला गती दिली आहे. 

शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. प्रत्येक घरात गणेशमूर्ती असते. मूर्तिकारांना प्रशासनाने घालून दिलेल्या कडक नियमावलीमुळे अनेक मूर्तिकारांनी सार्वजनिक श्रीमूर्ती करण्यास सुरुवात केलेली नाही. काही वर्षापासून प्लास्टर ऑफ पॅरीसपासून मूर्ती बनविण्यास निर्बंध लादले आहेत. यामुळे मागील वर्षी काही मूर्तिकारांनी निव्वळ शाडूच्या मूर्ती बनविल्या होत्या. प्रशासन आणि मूर्तिकारांमधील गुंता अजून सुटलेला नाही.