Mon, Mar 25, 2019 17:24होमपेज › Belgaon › कूपनलिका खोदाईसाठी परवानगीचे बंधन

कूपनलिका खोदाईसाठी परवानगीचे बंधन

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:16AM

बुकमार्क करा
 

बेळगाव : प्रतिनिधी

पाण्याची भूजल पातळी घटल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने कुपनलिका खोदाईसाठी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. तर निकामी ठरलेल्या कुपनलिका व्यवस्थिरित्या बुजविण्यात याव्यात यासाठीही सूचना केली आहे. याची जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार मोहिम हाती घेतली आहे. गावागावातील ग्रा. पं. सह जिल्हाधिकारी तालुका पंचायत जिल्हा पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे. 
राज्यामध्ये भु-जल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे सरकारने यावर कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वाधिक प्रमाणात भु-जल पातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग, सौंदत्ती आणि अथणी तालुक्यामध्ये भु-जल पातळी अधिक प्रमाणात घटली असल्याचे निदर्शनास आल्याने सदर तालुक्यांमध्ये कुपनलिका खोदाई करण्यासाठी कर्नाटक भू-जल खाते यांच्याकडून परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

तर उर्वरित तालुक्यामध्ये कुपनलिका खोदाई करण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या तालुका  समितीकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. कुपनलिका खोदाई करण्यापूर्वी संबंधीतांनी ग्रा. पं. सचिव, ग्रा. पं. विकास अधिकारी यांना 15 दिवस आदी कुपनलिका खोदाई करण्यात येणार्‍या ठिकाणाची व कुपनलिका खोदाई करणार्‍या कंत्राटदाराची माहिती देणे आवश्यक आहे. तर अत्याधिक प्रमाणात भू-जल पातळी घटलेल्या तालुक्यांमध्ये कुपनलिका खोदाई करण्यासाठी संबंधीत प्राधिकाराकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे.  ग्रामीण  पाणी  पुरवठा   विभागाकडून कुपनलिका खोदाई करताना संबंधीत भु-विज्ञान खात्याच्या अधिकार्‍यांचे शिफारस पत्र घेणे याबरोबरच परवानगी पत्र घेणेही सक्‍तीचे आहे. तसेच कुपनलिका खोदाई करणार्‍या यंत्रधारक मालकांनी कर्नाटक भु-जल प्राधिकार बंगळुर यांच्याकडे नोंद असणे आवश्यक असून संबंधीत कुपनलिका खोदाई धारकांची नोंद नसल्यास त्यांच्यावर जिल्हा प्रशासन व पोलिस खात्याकडून कारवाई करण्यात येईल.

हा नियम इतर राज्यातून कुपनलिका खोदाईसाठी येणार्‍या यंत्रधारकांना लागू आहे. या कायद्याचे उल्लघंन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे  प्रसिध्दी पत्रकातून कळविण्यात  आले आहे. निकामी कूपनलिका बुजविणे आवश्यक आहे. उघड्या असणार्‍या कुपनलिका न बुजविल्यास संबंधीत मालक तसेच कुपनलिका खोदाई करणार्‍या यंत्रमालकालाही कारणीभुत धरून कारवाई करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनासह ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग यांच्याकडून यासाठी पत्रके वाटून जनजागृती करण्यात येत आहे.