Sat, Sep 22, 2018 16:42होमपेज › Belgaon › श्रमदानातून बुजविला खड्डा

श्रमदानातून बुजविला खड्डा

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 12:12AMबेळगुंदी : वार्ताहर

मुख्य रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने युवकांनीच पुढाकार घेऊन खड्डे बुजविले. यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. युवकांच्या पुढाकारामुळे त्यांचे कौतुक  करण्यात येत आहे.

बेळगुंदी मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याचा फटका वाहनधारकांना बसत होता. त्याचबरोबर पाणी निचरा होण्याची सोय नसल्याने रस्त्यातच पाणी साचत होते. याची तक्रार केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने पंधरा दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीसाठी खड्डी आणून टाकली होती. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने दुरुस्तीकामाकडे दुर्लक्ष केले होते.

सध्या सुरू असणार्‍या पावसामुळे रस्त्यात पाणी साचत होते. त्याचबरोबर खड्ड्यात केवळ माती वाळू टाकली होती. ती उडून गेली होती. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.  यामुळे युवकांनी पुढाकार घेऊन खड्ड्यामध्ये खडी टाकली. पाण्याचा निचरा होण्याची सोय केली. प्रभाकर गावडा, प्रल्हाद चिरमुरकर, जोतिबा गावडा, रघुनाथ कुन्नूरकर, दयानंद गावडा, अजित कदम, अतुल शिंदे, अनंत हुबळीकर, शंकर शहापूर आदी युवकांनी श्रमदान केले.