Tue, Jul 23, 2019 10:46होमपेज › Belgaon › ‘निसर्ग  सांभाळा...तो सांभाळेल’

‘निसर्ग  सांभाळा...तो सांभाळेल’

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:33PMबेळगाव : सुनील आपटे

आगामी जागतिक युध्द पाण्यावरून होईल, असे शास्त्रज्ञ म्हणतात. यात तथ्य आहे. कारण जागतिक तापमानवाढ पाहिली तर  भूजल स्रोत कमालीचे आटत चालले आहेत. यासाठी निसर्गाला दोष देत असतो. खरे तर निसर्ग काहीच करत नाही. मानवाने हावरेपणाने निसर्गाला ओरबाडायला प्रारंभ केला आहे. निसर्ग एक-दोन इशारे देऊन पाहतो. पण मानव काही मतलबीपणा सोडायला तयार नाही. निसर्गसंपत्तीचे रक्षण करण्याऐवजी तो त्यावरच प्रहार करतो आहे. यामुळे अनेक धोक्यांना आणि संकटांना मानव आमंत्रण देत आहे. 

भूकंप, सुनामी, ज्वालामुखीचा उद्रेक, प्रचंड पाऊस आदी नैसर्गिक आपदा मानल्या जातात. परंतु हे सर्व ओढवून घेण्यास मानवच कारणीभूत आहे. मानवनिर्मित संकटांसाठी निसर्गाला दोष देऊन चालणार नाही. निसर्ग आपल्या आनंदात जगत असतो. तो इतरांना निरामय जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान करत असतो. ते आपण समजून घेतले पाहिजे. अन्यथा जीवसृष्टीचा विनाश अटळ आहे. ग. दि. माडगुळकर यांनी गीतरामायणात म्हटले आहे, की ‘वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा...पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’. हे आपण ऐकतो आणि सोडून देतो.  निसर्ग आपल्याला हातचे राखून न ठेवता भरभरून देत असतो. त्याच्याशी कृतज्ञ राहायचे की कृतघ्न व्हायचे, ते आपणच ठरवायला हवे.

उन्हाच्या झळा दिवसेंदिवस  तप्त होत आहेत. कधी नव्हे तो बेळगावचा पारा 42 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर कर्नाटकात गुलबर्गा येथे उच्चांकी 44.3 इतका पारा गेलो. यात उष्माघाताचे बळीही गेले आहेत. बेळगाव थंड हवेचे ठिकाण आणि गरिबांचे महाबळेश्‍वर राहिले नाही, असे आता म्हटले जाते. पण येथील थंडावा जपण्यासाठी मोजकेच पर्यावरणवादी आणि निसर्गस्नेही सक्रिय दिसतात. आपले परमकर्तव्य म्हणून निसर्गाचे संवर्धन आणि रक्षण करायला हवे, याची जाणीव आपल्याला कधी होणार? 

‘धर्मो रक्षति रक्षित:’ असे एक संस्कृत वचन आहे. असेच एक वचन आता रूढ करायला हवे. ‘निसर्ग सांभाळा...तो आपल्याला सांभाळेल’, हे आचरणात आणले जाईल, तेव्हाच निसर्ग आनंदी राहील आणि आपल्यालाही जगवेल. हा मंत्र आपल्याला आणि निसर्गाला तारक आहे, हे लक्षात घेऊन निसर्गाचे सच्चे मित्र बनायला हवे. हा संकल्प करून स्वत:बरोबरच इतरांनाही यात सहभागी करून घ्यायला हवे. बेळगावातील व्हॅक्सीन डेपो म्हणजे शहराचे फुफ्फुस आहे. हा परिसर निसर्ग आणि जैवविविधतेने नटलेला आहे. पण तिथेही अस्वच्छतेने शिरकाव केलेला आहे. हे टाळायला हवे, यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतात. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.

आज संपूर्ण जगभरातून पर्यावरण संदेशांचा मारा सुरू आहे. केवळ उपदेश अथवा आदेश, सक्ती करून चालणार नाही. पर्यावरण आणि निसर्ग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनायला हवा. पाणी हे पावसावर अवलंबून असते. पाऊस जंगले, वने, झाडे आदीवर अवलंबून असतो. परंतु या सार्‍याचा र्‍हास मानवाकडून होत असून याचा परिणाम  पर्जन्यमान आणि पर्यायाने पाणी उपलब्धतेवर झपाट्याने होत आहे. पाणीटंचाई भीषण बनत चालली आहे. आपण भावी पिढ्यांचा आणि समस्त जीवसृष्टीचा विचार करून कृतिशील पावले उचलायला हवीत. आपण जगा आणि निसर्ग जगवा यासाठी मानवाने सच्चेपणाने, निग्रहपूर्वक पर्यावरण आणि निसर्गसंवर्धनाला प्राधान्य द्यायला हवे. तरच  अवघी जीवसृष्टी तरेल आणि शाश्‍वतता राहील.

चला सांभाळू पर्यावरणाचा तोल 

कोणतेही प्रदूषण हे भूषण नाही तर दूषण आहे. त्याचे प्रत्येकाने चिंतन, मनन, आत्मपरीक्षण, निरीक्षण केल्यास ज्याठिकाणी प्रदूषण सुरू होते. त्याठिकाणीच ते थांबविणे गरजेचे आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग अतिमहत्वाचा आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रानेही याबाबत कठोर कर्तव्य पार पाडणे अनिवार्य आहे. शासन व प्रशासनाने सुद्धा बघ्याची भूमिका न घेता प्रभावी शाश्‍वत उपाय राबवावेत तरच पयावरणाचा तोल सांभाळता येईल. आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जपण्याचा समग्र विचार करून तो कृतीत आणण्याची गरज आहे.

भारतीय पारंपरिक सण समारंभाना निश्‍चितपणे काही सामाजिक अर्थ आहेत व काही पर्यावरणाचे संबधही  आहे. अनेक सण आपल्या कृषी संस्कृतीशी संबंधीत आहेत. आपण भक्तीभावाने वड पिंपळ, उंबर या झाडांची पूजा करतो. पर्यावरण संवर्धनात या वृक्षांचे कार्य मोलाचे आहे. भरपूर ऑक्सिजन देणारी ही झाडे असून चाळीस वर्षाचे  एक झाड हजारो लिटर पाण्याचे संवर्धन करते. तुळस मोठ्याप्रमाणात ऑक्सिजन देते म्हणून ग्रामीण भागातील शिक्षकांना स्कूलमध्ये याचे महत्व पटवून देऊन प्रत्येक मुलांना तुळशीची रोेपे दिली व त्यांच्या घराभोवती तुळशीचे कुंपण केले तर अनेक ऑक्सिजन पार्कस् तयार होतील. लहान मुले संस्कारक्षम असतात आणि  शिक्षकांच ऐकतात. त्या वयातच पाणी, वृक्ष, पर्यावरण याच्या संवर्धनाचा संस्कार रुजविला तर त्यातून मोठे कार्य उभे राहील. 
जागतिक तापमानवाढ कशी थांबवायची हवामान बदलास अटकाव  कसा करायचा, या व अशा स्थानिक व जागतिक  पर्यावरणीय समस्यांच स्वरुप हे मूळत: राजकीयच आहे. सध्या जगातील अर्थव्यवस्था पर्यावरणाच्या लुटीवरच आधारलेली आहे. मोठे-मोठे कारखाने हे आघाडीचे लुटारु आहेत. राजकीय सत्तेचे सर्व स्तर हे या उद्योगातील भागीदारांच्या ताब्यात आहेत.  आमचे नेते परदेशदौरा करतात. तेथील पर्यावरण आणि विकास यांचा समन्वय साधणारे प्रकल्प पाहतात व येऊन गुणगान गातात. पण करत तर काहीच नाहीत. पर्यावरण जपून विकास साधणारे प्रकल्प उभे करणे गरजेचे आहे. 

पर्यावरणाचा समातेल राखायचा असेल तर निसर्गावर आक्रमण करता कामा नये. प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे वातावरणावर अनिष्ट परिणाम झाला आहे. त्याची फळे आपण भोगत आहोत. पर्यावरण संवर्धनाकरिता शासनाकडून कोटी-कोटी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम पार पडतात. परंतु लावलेली झाडे वाचविण्याची जबाबदारी सर्वांवर आहे 

सेन्सरद्वारे (एअर क्वॉलिटी इंडेक्स) तापमान, आर्द्रता,  कार्बन डायऑक्साईड वायुचे प्रमाण मोजणे शक्य. अमेरिकेतील एका कंपनीने वायरलेस सेन्सर विकसित  केले आहे.

पर्यावरण रक्षणासाठी स्वच्छतादूतांची गरज

निपाणी : राजेश शेडगे

आज सर्वत्र पर्यावरण दिन साजरा केला जात असला तरी खरोखरच आपण याबद्दल जागरूक आहोत का, याचा विचार करणे आवश्यक आहे. मनुष्याकडून पर्यावरणावर होणार्‍या अतिक्रमणामुळे धोका निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. आपल्या परिसराच्या सफाईसाठी स्वच्छतादूत बनून काम करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

शहराचे पर्यावरण राखण्यासाठी स्वच्छ निपाणी, ग्रीन निपाणीची गरज आहे. रविवारी किंवा सुटीच्या दिवशी नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यायला हवा. उद्याने ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. शहरातील अनेक उद्याने अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या उद्यानातील वनस्पतींची जपणूक करणे, नव्याने वृक्षारोपण करून झाडांची जोपासना करणे गरजेचे आहे.

शहरातील उद्यानांकडे प्रशासन व नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. या उद्यानांचे संवर्धन करण्याबरोबरच त्याच्या सुशोभिकरणासाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. रस्तारुंदी, शहरीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात होणार्‍या वृक्षतोडीमुळे जंगले ओसाड होत आहेत. पशू, पक्षी व अन्य जीवांची अवैध शिकार सुरू आहे. वाढते तापमान, वणवा, पाणी, खाद्याचे दुर्भिक्ष्य यामुळे वन्यप्राणी जंगले सोडून गावाकडे धावत आहेत. काही प्राणी पाण्याअभावी जीवाला मुकत आहेत.

बदलत्या हवामानचक्रामुळे पर्यावरण असंतुलनाचे परिणाम मानवाला भोगावे लागत आहेत. विविध कारणांमुळे पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होऊन गंभीर परिणाम सोसावे लागतील, असे भाकितही वर्तविले जात आहे. 2025 पर्यंत भारतात पाणीबाणी निर्माण होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विकासाची फळे पर्यावरणाचा बळी देऊन चाखायची असतील तर येणार्‍या पिढीला देण्यासाठी काहीच उरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पाऊल उचलावे. गावातील, शहरातील प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावून त्याचे जतन करणे आवश्यक आहे. पशू-पक्षी, पाणी याच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली पाहिजे.