Sun, Oct 20, 2019 01:10होमपेज › Belgaon › बेळगावात ‘वीजमीटर’ तपासणी केंद्र

बेळगावात ‘वीजमीटर’ तपासणी केंद्र

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 20 2017 1:19AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

घरगुती व अन्य वीजपुरवठा मोजण्यासाठी बसविण्यात येणार्‍या मीटर तपासणीसाठी आवश्यक केंद्र बेळगावात जानेवारीपासून सुरू होणार आहे. याची तयारी जोमाने सुरू असून याचा फायदा बेळगाव जिल्ह्यासह विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यालाही होणार आहे. यासाठी  2 कोटी 61 लाख रु. खर्च येणार आहे.

गांधीनगर येथील हेस्कॉम कार्यालयात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्रातून बेळगाव, विजापूर आणि बागलकोट जिल्ह्यातील ग्राहकांना पुरविण्यात येणार्‍या वीजमीटरचे परीक्षण करून पाठविण्यात येणार आहे.

यासाठी आवश्यक यंत्रसामग्री जर्मनीहून आयात करण्यात आली असून सध्या ती मुंबई येथे आली आहे. लवकरच ती बेळगावात येणार असल्याची माहिती बेळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता (विद्युत) सी. बी. यक्कंची यांनी दिली.

या यंत्राने सुसज्ज असणार्‍या तपासणी केंद्रात दीड तासात सुमारे 50 वीजमीटरचे चार टप्प्यात परीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये मीटरच्या  वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेण्यात येतात. त्यानंतर ग्राहकांना पुरविण्यात येतात. 

संपूर्ण संगणकीकृत यंत्रणा कार्यरत केली जाणार आहे. त्यातून मीटरमध्ये असणार्‍या दोषाची माहिती संगणकावर मिळणार आहे. या ठिकाणी परीक्षण केलेले मीटर संबंधित जिल्ह्यामध्ये सील करून पाठविण्यात येतील. तेथून त्याचा पुरवठा ग्राहकांना केला जातो. याठिकाणी दररोज सुमारे 210 हून अधिक मीटरचे परीक्षण करण्याची क्षमता असेल.
जुन्या यंत्रणेच्या वापरानुसार दररोज केवळ 20 वीजमीटरचे परीक्षण करणे शक्य आहे. मात्र नव्या यंत्राच्या वापरामुळे दररोज सुमारे 210 मीटरची तपासणी करणे शक्य होणार आहे.