Tue, Jul 16, 2019 10:05होमपेज › Belgaon › अघोषित भारनियमनाचे संकट!

अघोषित भारनियमनाचे संकट!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पात कोळशाची गंभीर समस्या निर्माण झाल्याने सर्वत्र अभूतपूर्व वीज टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात अघोषित भारनियमनाची शक्यता निर्माण झाली आहे. रायचूर औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील आठ पैकी तीन युनिटस् बंद झाल्याने व बळ्ळारी आणि होसपेट येथील ऊर्जा निर्मिती प्रकल्पातही कच्चा माल नसल्याने समस्या अधिकच गंभीर बनली आहे. 

राज्यामध्ये औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना मागणीप्रमाणे खूपच अल्पसा दगडी कोळसा उपलब्ध असल्याने वीज निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जलविद्युतीचे प्रमाण वाढवावे म्हटले तर ऐन उन्हाळ्यात विजेची व पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. एकंदरीत दगडी कोळशाच्या तीव्र टंचाईमुळे राज्यात भारनियमनाची टांगती तलवार आहे. 

एकतर राज्यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची खरेदी करावयाची नाही तर भारनियमन करायचे हे दोनच पर्याय सरकारसमोर आहेत. सध्या विद्युत खात्यातर्फे प्रतिदिन 900 मेगावॅट विजेची खरेदी केली जात आहे. मार्च अखेरपर्यंत ती खरेदी चालूच ठेवण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त वीज खरेदी केली तर राज्याच्या तिजोरीवर ताण पडणार आहे. या परिस्थितीत विद्युत खात्याने जलविद्युत निर्मितीच्या प्रमुख तीन केंद्राद्वारे 15 दशलक्ष विद्युत निर्मिती केली जात आहे. 10 दशलक्ष युनिट निर्मितीऐवजी जादा 5 दशलक्ष जलविद्युत निर्मिती केली जात आहे. 

राज्याचे मुख्य सचिव सुभाषचंद्र खुंटिया यानी जलविद्युत निर्मिती केंद्रामधून 10 दशलक्ष युनिटपेक्षा जास्त विद्युत निर्मिती करु नका असे सूचित केले आहे.केपीसीएलने दररोज 500 मेगावॅट इतका विजपुरवठा कपात केला आहे. परंतू अद्याप या संदर्भात वीज उत्पादनाचे लक्ष्य ठरविण्यासाठी बैठक घेतली नसल्याचे अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले. केपीसीएलने जानेवारी अखेरपर्यंत 1100 मेगावॅट वीज रायचूर औष्णिक केंद्रातून पुरवठा करण्याची ग्वाही दिलेली आहे. परंतू प्रत्यक्षात तेथून 800 ते 1000 मेगावॅट इतकीच वीज दिली जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये दररोज उद्योग, व्यापर व बाजारपेठेमध्ये व घरगुती वापराच्या वाढत्या काळात वीज कपात करावी लागत आहे.विद्युत खात्याच्या अभियंत्यानी आता सौरऊर्जा व पवन उर्जावर लक्ष केंद्रीत केल्याशिवाय दररोजची विजेची मागणी भागविता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

कर्नाटक वीज महामंडळाचे संचालक जी. कुमारनायक म्हणाले, सध्या आम्ही दगडी कोळशाच्या तीव्र टंचाईला तोंड देत असून ती टंचाई दूर करण्यासाठी आम्ही गांभिर्याने प्रयत्न करीत आहोत.