Thu, Jun 20, 2019 20:41होमपेज › Belgaon › वीज दरवाढीचा सर्वच क्षेत्रावर होणार परिणाम

वीज दरवाढीचा सर्वच क्षेत्रावर होणार परिणाम

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस आणि निजद युती सरकारने गुरुवारी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये प्रतियुनिट 20 पैसे वीजदरवाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. वीज दरवाढीचा मोठा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होणार आहे. यामुळे सर्वसामान्य व उद्योगपतींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

महिनाभरापूर्वी हेस्कॉमने प्रतियुनिट 10 पैसे वीज दरवाढ केली होती. यामुळे बेळगावमधील उद्योगधंदे संकटात सापडले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला जात आहे. व्यावसायिक आणि घरगुती वीज दरवाढ प्रतियुनिट वीस टक्के केली आहे. यामुळे सामान्यांना देखील याचा फटका बसणार आहे. 

प्रत्येक वेळी वीज दरवाढ झाल्यास डिझेलचा आधार घेतला जात होता. मात्र, यावेळी डिझेलची दरवाढ देखील करण्याची घोषणा केली आहे. यामुळे उद्योगधंद्यांना कोंडीत पकडण्याचे काम सरकारने चालविले आहे. 

इंधन व वीज दरवाढीचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसून येणार आहे. सरकारने सर्वसामान्यांचा विचार केला नाही. शेतकर्‍यांना कर्जमाफी केली आहे. मात्र, याचा भार सर्वसामान्यांवर घातला आहे, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य व उद्योगपतींमधून व्यक्त केल्या जात आहेत. 

नोटाबंदी, जीएसटी, नियमित होणारी इंधन दरवाढ तसेच सध्या झालेली वीज वाढ यामुळे उद्योगधंदे अडचणीत आले आहेत.  वीज दरवाढ व डिझेलच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. -भूषण काकतकर, उद्योगपती

इतके दिवस आम्ही आंदोलन करूनही सरकारला जाग आली नाही,आगामी निवडणुकीत सोलापूरची जनता सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादीला धडा शिकविणार आहे. - व्यंकटेश सरनोबत, उद्योगपती

यापूर्वी महिन्याकाठी अडिचशे ते तीनशेच्या घरात वीजबिल येत होते. आता ही रक्कम वाढीव होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. - विजय गुरव, गृहस्थ

प्रत्येकावर वीज दरवाढीचा परिणाम होणार आहे. यामुळे महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.  इंधन दरवाढीमुळे ट्रान्स्पोर्ट खर्च वाढेल. - महेश बागी, व्यावसायिक