Sat, Jan 19, 2019 20:43होमपेज › Belgaon › जांबोटी भागात महिनाभर वीज खंडित

जांबोटी भागात महिनाभर वीज खंडित

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 07 2018 11:10PMजांबोटी : वार्ताहर

तीस वर्षे संपत आले तरी जांबोटीसह खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वीजवाहिन्या, विद्युत खांब आणि टीसींची दुरुस्ती अद्याप होऊ शकली नाही. यामुळे जोबोटी भागात महिनाभर वीज खंडित आहे.

लोंबकळणार्‍या तारांची समस्या गंभीर आहे. जांबोटी भागात अनेक ठिकाणी जमीन, झाड, घर आणि सार्वजनिक ठिकाणी लोंबकळणार्‍या तारांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी या सर्व ठिकाणी वावणार्‍या नागरिकांच्या जीवाला धोका असताना त्याच्या दुुरुस्तीकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष झाले आहे. 

तालुक्याचा ग्रामीण भाग जंगलाने व्यापला असल्याने वीजसेवेत वारंवार बिघाड होत असतात. तीस वर्षापासून तारा, खांब, ट्रान्सफॉर्मर बदलले नसल्याने पाच वर्षात बारमाही सेवेत बिघाड  होत  आहे. खांड मोडून पडणे, तार तुटणे, टीसी जळण्यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे वर्षात दोन महिनेच वीज व्यवस्थित असते. जांबोटीतील वन नाक्याजवळ तारा झाडावर लोंबकळत आहेत. देवाचीहट्टी-कालमणीमध्ये मलप्रभा नदीजवळ असलेल्या रमेश सुतार यांच्या घराकडील टीसी चार वर्षापासून कलंडल आहे. याची अनेकवेळा हेस्कॉमला कल्पना देऊही दुर्लक्ष करण्यात आले आहे. कणकुंबीपर्यंत जाणारी मुख्य वीजसेवा नादुरुस्त आहे. वाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार तुटतात, खांब मोडतात तर टीसींमधील वायरिंग खराब झाले आहे. या सेवांची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थ करतात.