Sun, May 19, 2019 22:38होमपेज › Belgaon › कार्यकर्त्यांनो, जरा दमानं..!

कार्यकर्त्यांनो, जरा दमानं..!

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 9:02PMखानापूर : वासुदेव चौगुले

विधानसभेचा आखाडा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना संभाव्य उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर आपल्या नेत्यांच्या प्रचाराचा धुरळा उडविला असून आपलाच नेता श्रेष्ठ कसा, हे दाखविण्यासाठी चढाओढ लागली आहे. व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर नेत्यांच्या समर्थनार्थ शक्कल लढवून वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात येत आहेत. 

उमेदवारांपेक्षा त्यांच्या समर्थकांनाच निवडणुकीची लगीनघाई लागली असल्याचे दिसून येत आहे. काही अतिउत्साही कार्यकर्ते त्यांच्या नेत्यावरुन ऊतू जाणार्‍या प्रेमाखातर खुन्नसयुक्त भाषेत शेरेबाजी करत असल्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तंग वातावरण निर्माण होत आहे.

एका ग्रुपमध्ये वेगवेगळ्या मताचे आणि वेगवेगळ्या नेत्याला मानणारे कार्यकर्ते असल्यास ठरावीक नेत्याच्या समर्थनातील पोस्टवरुन वादविवाद झडण्याचे प्रकार घडत आहेत. या सर्व खटाटोपामध्ये नेटकरी कार्यकर्ता दिवस-रात्र ऑनलाईन राहत असल्याने सोशल मीडियाचा अमर्याद वापर होत असल्याचे दिसून येत आहे.

राजकारणी कायमस्वरुपी कोणाचेही मित्र अथवा शत्रू नसतात. हे मूलभूत तत्व विसरुन युवापिढी नाहकपणे अतिउत्साहाने नेत्याची चमकोगिरी करण्यात धन्यता मानत आहे. बहुतेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये उमेदवारी व सरसतेवरुन जोरदार राजकीय चर्चा झडत असून परस्पर मतभिन्नता असलेल्या कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपत आहे. त्यामुळे ग्रुप अ‍ॅडमिनला हस्तक्षेप करुन वातावरण नियंत्रणात आणावे लागत आहे.

सोशलवर व्यक्त होण्याच्या अमर्याद प्रमाणामुळे राजकारणात आपसातील नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी नेटकरी कार्यकर्त्याने संयमाने व्यक्त होण्याची गरज आहे.मागीलवेळी ज्या कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लाऊन एखाद्या नेत्याचा प्रचार केला आहे. 

त्या नेत्याकडून योग्य सन्मान मिळाला नसल्यास अशा नेत्यांची सोशलवर चांगली पंचारती ओवाळण्याचे प्रकार घडत आहेत. उणीधुनी काढण्याच्या या प्रकाराचे व्यक्तिगत द्वेषात रुपांतर होत असल्याने वेळीच सावध होण्याची गरज आहे.