Mon, Apr 22, 2019 06:25होमपेज › Belgaon › पैसे वाटणार्‍या पतसंस्थेच्या कर्मचार्‍यावर गुन्हा

पैसे वाटणार्‍या पतसंस्थेच्या कर्मचार्‍यावर गुन्हा

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 1:03AMनिपाणी : प्रतिनिधी

निवडणूक प्रचारचे निमित्त करून भाजपतर्फे रविवारी रात्री मतदारांना अमिषे दाखवून पैसे वाटणार्‍या बिरेश्‍वर के्रडिट सौहार्दच्या शिरगुप्पी  शाखेतील कर्मचार्‍यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्पाक हुसेनसाब मोमीन (वय 25, रा. भिसे गल्ली, निपाणी) असे त्याचे नाव आहे.

निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक मंजुनाथ शिवाप्पा करोशी यांनी मोमीनविरोधात फिर्याद  दिली आहे. घटनेनंतर अश्पाक याला विरोधी गटातील  काही कार्यकर्त्यासह  नागरिकांनी बेदम चोप दिला. त्यामुळे मारहाण करणार्‍या चौघांविरोधातही फिर्याद दाखल झाली आहे. अश्पाक बिरेश्‍वर शाखेत क्लार्क म्हणून कार्यरत आहे. रविवारी रात्री प्रचारासह पैसे वाटप  करण्यात येत होते.
पैसे वाटताना विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून बेदम चोप देताना मोठा गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सीपीआय मुत्ताण्णा सरवगोळ यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. 

मोमीन याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. निवडणूक विभागाचे निरिक्षक व पोलीस अधिकार्‍यांनी चौकशी केल्यावर त्याच्याकडील बॅगेत भाजपचे प्रचार साहित्य, मतदार यादी आणि रोख रक्कम आढळून आली. त्यामुळे निवडणूक विभागाचे करोशी यांनी कलम 171 ई, 171 एच, 123 आरपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत अश्पाक मोमीन यांनी आपणाला हाताने व दगडाने मारहाण करणार्‍या राकेश सदाशिव बुवा, राजेश सदाशिव बुवा, रावसाहेब आप्पासाहेब गुरव, श्रीकांत रामचंद्र ढाफळे (रा. शिरगुप्पी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणार्‍या चौघाविरोधात गुन्हा दाखल  केला आहे. अश्पाक मोमीन यांच्यासह मारहाण करणार्‍या चौघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून सीपीआय सरवगोळ पुढील तपास करीत आहेत.

पोलीस ठाण्यासमोरच हाणामारी

या घटनेमुळे शहर पोलीस ठाण्यासमोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काँग्रेस व भाजप पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी मोठी गर्दी केली. यावेळी भाजप व काँग्रेसच्या दोन्ही स्विय साहाय्यकांमध्ये हाणामारी झाली.