Thu, May 23, 2019 21:00
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मध्यावर जून... अन् कडक ऊन

मध्यावर जून... अन् कडक ऊन

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र मान्सूनने दडी मारल्याने बळीराजाला चिंता लागून आहे. हवामान खात्याचा शत प्रतिशत पर्जन्यमानाचा अंदाज असताना नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्याचा मध्य आला तरी अद्याप कडकडीत ऊन पडत आहे. त्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात कृषी विभागातर्फे 6 लाख 79 हेक्टर क्षेत्र इतके पेरणीचे उद्दिष्ट आहे. यात ऊस पिकाचे क्षेत्र 1 लाख 81 हजार हेक्टर असून अन्य पिकांची 78 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. ऊस पीक वगळता खरीप पेरणी केलेले क्षेत्र हे केवळ 16 टक्के इतके आहे. जिल्ह्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्याप्रमाणात असल्याने सद्यस्थितीत मान्सून पावसाची गरज आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून खरीप पिकामध्ये उसाचे क्षेत्र निम्म्याहून घटले आहे. यंदा पेरणी क्षेत्राचा विचार करता सद्यस्थितीत किमान 50 टक्के क्षेत्र पेरणी पूर्ण होणे गरजे आहे. मात्र यंदा बहुतांश पेरणी अद्याप रखडलेली आहे. 

जिल्ह्यात भात , सोयाबीन, कापूस, मका, जोंधळा या पिकांचे अधिक उत्पादन घेतले जाते. यंदा मे महिन्यापासूनच वळीव पावसाने अधूनमधून मोठ्याप्रमाणात हजेरी लावली आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्‍लवित झाल्या असताना पुन्हा मान्सूनने दगा दिला आहे. यामुळे खरीप हंगामावर चिंतेचे सावट पसरले असून बळीराजाचे लक्ष पावसाकडे लागून आहे. 

पेरणी लांबणीवर? 

रविवार दि. 10 रोजी मान्सूनने दमदार एन्ट्री केली. मात्र,  दुसर्‍या दिवसापासून पावसाने दडी मारली आहे. सध्या कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकर्‍यांनी मान्सून लांबणीवर जाण्याची धास्ती घेतली आहे. तसेच  उर्वरित पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 

भातपिकावर अद्याप परिणाम नाही 

जमिनीत पहिल्या पावसाचा ओलावा अद्याप आहे. या ओलाव्याने मोठ्या प्रमाणात तण वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत पेरा केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका व्यक्‍त करण्यात येत आहे. त्यामुळे  काही दिवसानंतर पेरणीचा बेत आखला जात आहे. आणखी पाच ते सहा दिवस मान्सून लांबला तरी भात पिकावर परिणाम होणार नाही. मात्र, यापुढे मान्सून लांबणीवर गेला तर भातपिकासह अन्य पिकांना फटका बसू शकतो.