Thu, Feb 21, 2019 15:50होमपेज › Belgaon › तीन शाळकरी मुलांचा खाणीत मृत्यू

तीन शाळकरी मुलांचा खाणीत मृत्यू

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:32AMउचगाव : वार्ताहर

शाळेला सुट्टी पडल्यामुळे उष्म्यापासून सुटका करून घेण्यासाठी खाणीत पोहण्यास गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा रविवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. मण्णूरजवळच्या खडीमशीनच्या खाणीत ही दुर्घटना घडली. त्यामुळे मण्णूर गावावर शोककळा पसरली आहे.

आकाश कल्लाप्पा चौगुले (वय 14), साहिल मनोहर बाळेकुंद्री (14), आणि कुशन कल्लाप्पा चौगुले (10) अशी मुलांची नावे आहेत. आकाश व साहिलने आठवीची परीक्षा दिली होती, तर कुशनने चौथीची परीक्षा दिली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मण्णूरच्या मरगाई गल्लीमधील काही मुले सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मण्णूर-गोजगा गावांच्या दरम्यान  असलेल्या खडी मशीनच्या खाणीमध्ये पोहण्यासाठी गेली होती. त्यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे सोबत त्यांनी तेलाचे पाच लिटरचे प्लास्टिक डबे घेतले होते.

डबा सुटला

दुपारी तीनच्या सुमारास आकाश, साहिल व कुशन हे तिघे खाणीच्या काठावर आपले कपडे व बूट-चप्पल उतरवून प्लास्टिक डबे पोटाला बांधून पाण्यात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज नव्हता. त्यामुळे ते खाणीच्या मध्यभागी गेले; पण त्याचवेळी पोटाला बांधलेले डबे सुटल्याने ते पाण्यात बुडू लागले. ते पाहून त्यांच्यासोबत आलेले आणि खाणीच्या काठावर बसलेले त्यांचे मित्र आरडाओरडा करू लागले. त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात गेले नाहीत. मात्र, घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी मुख्य रस्त्याकडे धाव घेऊन तिघेजण बुडत असल्याचे गावकर्‍यांना सांगितले. 

पाहता पाहता ही माहिती गावात पसरली आणि गावातील शेकडो  युवक आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तरुणांनी पटापट पाण्यात उड्या मारून शोधमोहीम सुरू केली. तोपर्यंत अग्‍निशामक दल आणि पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते; पण अग्‍निशामक जवान पोहोचण्यापूर्वीच गावातील तरुणांनी तिन्ही मुलांना बाहेर काढले आणि तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवले. परंतु, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. आकाशच्या पश्‍चात आई-वडील आणि एक भाऊ आहे. त्याचे वडील गंवडी काम करून उदरनिर्वाह चालवितात. 

Tags : Belgaum, Belgaum news,  three school children, death, mine,