Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Belgaon › टोळक्याकडून तीन डॉक्टरांना मारहाण

टोळक्याकडून तीन डॉक्टरांना मारहाण

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:34AMबेळगाव : प्रतिनिधी

गोव्याहून पर्यटन करून परतणार्‍या तिघा डॉक्टरांना चोर्ला घाटामध्ये 8 जणांच्या मद्यपी टोकळ्याने  जबर मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. जखमी  डॉक्टरांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली आहे. 

रविवारी सायंकाळी गोव्याहून पर्यटन करून हे डॉक्टर बेळगावकडे परत येत होते. सायंकाळी 7 च्या दरम्यान कणकुंबीजवळील वनाधिकार्‍यांच्या बंगल्याजवळ सदर घटना घडली.  सुरल येथे जेवण करून ते परत येत होते. डॉक्टरांच्या कारने एका कारला ओव्हरटेक केले. त्यावेळी सदर कारमधील युवकांनी वेगाने पुढे येऊन कार रस्त्याच्या मधोमध थांबविली. 

सदर दारू ढोसलेल्या युवकांपैकी तिघांनी कार चालक डॉक्टराला खिडकीतून मारहाण केली. यानंतर मद्यपी युवकांमधील आणखी तिघांनी डॉक्टरांच्या कारची काच फोडून इतर डॉक्टरांनाही मारहाण केली. या घटनेमध्ये डॉक्टरांच्या सहकार्‍योपैकी एकाच्या डोळ्याला व हाताला जबर मार लागला आहे. एवढ्यावरच न थांबता टोळक्याने डॉक्टरांच्या कारची चावी हिसकावून घेतली आणि त्यांना मध्यावरच सोडून पळून गेले. डॉक्टरांनी कणकुंबी येथील आयबीमधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. 

वाहन क्रमांकावरून शोध जारी ठेवला आहे. वाहन बेळगाव येथील वंटमुरी परिसरातील असून ऑटोनगर परिसरात ते  राहत असल्याची माहिती मिळाली. मारहाण केलेल्यांपैकी तिघांना खानापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. टोळक्यात आणखी 5 जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.  

दर रविवारी घाटातील गोवा व बेळगावला ये-जा करणार्‍या वाहनचालकांची संख्या मोठी असते. मात्र अशाप्रकारच्या घटना घडत असताना कोणीही पोलिस उपलब्ध नव्हते. काही बोलण्याआधीच टोळक्याने मारहाण केली.  वाहनाची चावी हिसकावून पळ काढला. रात्री उशिरापर्यंत घाटातच राहावे लागले. घरच्यांना माहिती देऊन डुप्लिकेट चावीचा वापर करून घरी परतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.