Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Belgaon › शेतकर्‍याने गरीब समजू नये : सिद्धेश्‍वर स्वामी

शेतकर्‍याने गरीब समजू नये : सिद्धेश्‍वर स्वामी

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 10:34PMजमखंडी : वार्ताहर  

सर्व प्राणिमात्रांचे रक्षण करणारी भू-माता आहे. या भू-संपत्तीचा मालक शेतकरी असून त्याने स्वतःला कधीही गरीब न समजता, पराभव न मानता सतत भगीरथाप्रमाणे परिश्रम करावेत, तरच जीवनाचे सार्थक होते, असे प्रतिपादन विजापूर ज्ञानयोगाश्रमचे  सिद्धेश्‍वर स्वामी यांनी केले. तालुक्यातील चिक्कलकी क्रॉस येथील तपोवन भगीरथ पीठाच्या महाद्वार उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

शिवानंद स्वामींच्या सहयोगाने सत्संग व महाद्वार उद्घाटन कार्यक्रम झाला. परिश्रम, कष्ट यातून आनंद घेत सतत प्रयत्न करून यश संपादन करावे. वस्त्रे, माणिक ही संपत्ती क्षणिक असून शाश्‍वत संपती भूमी आहे. भूमिपुत्राने कधीही आपल्याला गरीब समजू नये, असे विचार सिद्धेश्‍वर स्वामींनी व्यक्त केले. 

भारतात मठ, मंदिरे हजारो वर्षापासून धर्मोपदेश, संस्कार देण्याचे कार्य करीत आहेत. सार्थक जीवनाकरिता त्यांची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आ. श्रीकांत कुलकर्णी यांनी यावेळी केले. येथील शिवानंद स्वामींच्या आश्रमात सत्संगाने जीवनमूल्य समजाविण्याचे प्रशंसनीय कार्य होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. बाबूराव शरण, माजी विधान परिषद सदस्य जी. एस. न्यामगौड, चिन्मयानंद स्वामी, शिवानंद स्वामी यांनी विचार व्यक्त केले. 

आनंद न्यामगौड, बसवराज कलुती, श्रीमंत चौरी, जक्कप्पा यडवे, मुत्तण्णा शिवण्णावर, कमला जेडर, अनिल अवळे, धरप्पा गुग्गरी आदी उपस्थित होते. प्रकाश हळ्ळूर यांच्या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. एल. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वाय. एस. कोणारी यांनी आभार मानले.