होमपेज › Belgaon › सत्कारासाठी हार नकोत, वह्या स्वीकारा

सत्कारासाठी हार नकोत, वह्या स्वीकारा

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 7:54PMबेळगाव : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना शहरातील एका प्रयोगशील शिक्षकाने सत्कारावेळी बुक्के नको तर बुके (वह्या)स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. या माध्यमातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल असे त्यांनी सुचविले आहे.आमदारांचे निवडणुकीनंतर  ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार होत आहे. यासाठी महागड्या किमतीचे हार, बुके देण्यात येतात. यातून पैशाचा चुराडा होतो. मात्र हा सत्कार सत्कारणी लावण्यासाठी आमदारांनी कार्यकर्त्यांना सूचना द्यावी की सत्कारावेळी हार अथवा बुके देण्याऐवजी केवळ वह्या द्याव्यात.

याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व आमदारांना मराठी व कानडी भाषेतून सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजित चौगुले यांनी दिले आहे.मागील काही वर्षापासून हा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. लोकप्रतिनिधींना भेटून त्यांना पत्र लिहून जागृती करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पुन्हा एकदा सर्व आमदारांना त्यांनी पत्र लिहिले आहे. सत्कार कार्यक्रमात वह्यांचा स्वीकार केल्यास याचा फायदा गरीब आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांना होईल. आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करणे शक्य होईल. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 29 पासून होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वह्या देऊन त्यांचे स्वागत केल्यास  विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन मिळेल. लोकप्रतिनिधींना गरजू विद्यार्थ्यांला मदत केल्याचे समाधान मिळेल, यासाठी हा उपक्रम सुरू करावा, असे त्यांनी सुचविले आहे.