Tue, Mar 19, 2019 03:14होमपेज › Belgaon › राहुल गांधी यांची ‘यंग टीम’

राहुल गांधी यांची ‘यंग टीम’

Published On: Jul 05 2018 1:37AM | Last Updated: Jul 05 2018 12:22AMबंगळूर : प्रतिनिधी 

ज्येष्ठ नेत्यांना डावलून कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिनेश गुंडुराव यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी ईश्‍वर खांडरे यांची, तर काँग्रेस-निजद सरकारचे मुख्य प्रतोद म्हणून चिकोडी-सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांची नियुक्‍ती झाली आहे.

तिन्ही नेते पन्‍नाशीच्या आतले असून, या निवडींवर अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची छाप आहे. गुंडुराव व खांडरे यांची नियुक्‍ती, तर राहुल यांनीच केली आहे. माजी मंत्री असलेले गुंडुराव आधी प्रदेश कार्याध्यक्ष होते. काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी त्या दोघांची नियुक्‍ती झाल्याचे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहे. 

उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद होते.  दिनेश गुंडुराव हे माजी मुख्यमंत्री आर. गुंडुराव यांचे पुत्र आहेत. ते गांधीनगर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. चिकोडी-सदलग्याचे आमदार गणेश हुक्केरी यांची सरकारमध्ये मुख्य प्रतोदपदी त्यांची नियुक्‍ती  विधानसभा अध्यक्ष  रमेशकुमार यांनी बुधवारी अधिवेशनावेळी जाहीर केली आहे.  यापूर्वीही आमदार गणेश हुक्केरी यांची काँग्रेस सरकारने मुख्य प्रतोदपदी नियुक्ती केली होती.

बेळगाव जिल्ह्याला दुसर्‍यांदा मानाचे पद

मागच्या सरकारात राज्य सरकारचे हे पद रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांना मिळाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गणेश हुक्केरींना मिळाल्यामुळे दुसर्‍यांदा बेळगाव जिल्ह्यास हे पद लाभले आहे. त्यांना मागच्या सरकारात महसूल खात्याचे विधिमंडळाचे सचिवपद देण्यात आले होते.