Wed, Jul 17, 2019 08:44होमपेज › Belgaon › ‘अनंतकोटी’ भक्‍तिमार्ग बेळगावकरांना भावला!

‘अनंतकोटी’ भक्‍तिमार्ग बेळगावकरांना भावला!

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 10 2018 12:04AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

आराधना केंद्रातर्फे अक्‍कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या जीवनावरील ‘अनंतकोटी’ या महानाट्याचा प्रयोग सोमवारी ध. संभाजी उद्यानात पार पडला. स्वामी समर्थांच्या परमार्थी जीवनाचा अनंतकोटी भक्‍तिमार्ग बेळगावकरांना भावला. नाट्याची संकल्पना दीपाली पांचाळ यांची होती. लेखन व दिग्दर्शन राजन कोठारकर, संगीत मधु रेडकर यांचे होते. गायक अक्षय म्हात्रे, मंजिरी कामत, अलका पंडित, जगदीश शेलार, सारंग यांच्या मधुर स्वरांनी बेळगावकरांच्या हृदयात स्थान निर्माण केले. नेपथ्य अशोक पालेकर, वेशभूषा अक्षता दरेकर तर रंगभूषा मालगुंडकर गुरुजी यांनी केले. 

नाटकात कृपासिंधू प्रफुल्ल सामंत यांनी समर्थांची भूमिका साकारली. स्वामी समर्थ नेहमी सांगत असत की, काही माणसामाणसामध्ये विंचवाची प्रवृत्ती आहे. ती नष्ट करायची असेल तर स्वार्थीपणा हटवा. चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही प्रवृत्ती बळावत चालली आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच रोखले पाहिजे. हा आशय विविध पात्रांद्वारे सांगण्यात आला. पूर्वी कोणाच्याही घरी कुबडाने प्रवेश केला तर त्या घरच्या लोकांनी ते घरच सोडून जायचे, अशी अंधश्रध्दा होती. ती नष्ट होण्यासाठी स्वामी संबंधित घरी जाऊन प्रबोधन करायचे. ही भूमिकाही मांडून अंधश्रध्दा नष्ट करा असे सूचित केले. 

कोणाच्या घरी माणसे आजारी पडली तर त्याचा दोष गावदेवीला दिला जात असे. या गावदेवीची विटंबना होत असे. मात्र स्वामी समर्थ त्या लोकांना भेटून आजारी पडण्यामागे देवीचा काडीमात्र संबंध नसून वैद्यकीय कारणे असल्याचे स्पष्ट करुन देत असत. नाटकात समाजात परमार्थ कसा वाढेल, याचाही ऊहापोह केला आहे. दिनेश अहिरे (चोळाप्पा), सारंग अग्निहोत्री (बाळाप्पा), जगदीश शेलार (रिसालदार आणि स्वामीसुत), पल्लवी देशपांडे (येसूरबाई), सुजाता उपाध्ये (सुंदराबाई), वृषाली मोलवेडेकर (नर्तकी), मेघा परब (राणी), मताली सकपाळ (देवी), अमित सावंत (राजा), अमोल ओलटीकर (शास्त्री व पहारेकरी), स्वप्नील कांबळे (पंडित व पहारेकरी), ओमकार जुवेकर (गजानन व सेवेकरी), यांनी भूमिका केल्या. आराधना केंद्राचे अध्यक्ष नारायण पाटील, सचिव सुनील चौगुले, खजिनदार विकास मजूकर यांनी याबाबत नेटके नियोजन केले.