Wed, Mar 27, 2019 01:59होमपेज › Belgaon › ‘पुढारी’चा दणका, ‘आरोग्य’ची झाडाझडती

‘पुढारी’चा दणका, ‘आरोग्य’ची झाडाझडती

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 1:02AMबेळगाव : प्रतिनिधी

वडगाव, शहापूर, खासबागमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्याकडे केलेले दुर्लक्ष दै.‘पुढारी’ने गेले आठ दिवस सातत्याने मांडल्याने मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सार्‍याच नगरसेवकांनी आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले. आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष राजू बिर्जे यांनी 26 जूनचा ‘पुढारी’चा अंक बैठकीत झळकवून महापालिकेचे वाभाडे निघाल्याची टीका केली. त्यानंतर हबकलेल्या अधिकार्‍यांनी सायंकाळी वडगाव-खासबागची पाहणी करून गटारींची स्वच्छता आणि कचरा उचल तातडीने करण्याच्या सूचना कर्मचार्‍यांना दिल्या. मंगळवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजिण्यात आली होती. मात्र ‘पुढारी’च्या वार्तांकनामुळे पूर्ण सभा शहराची स्वच्छता आणि अपुरी आरोग्यसेवा याभोवतीच फिरली. 

शहर स्वच्छतेवर दरवर्षी 40 कोटी रुपयांचा खर्च केला जात असताना शहरातील गल्लोगल्लीमध्ये केरकचर्‍याचे ढीग का? केरकचर्‍याचे वर्गीकरण केले जात असेल तर कचरा एका ठिकाणी का साठविला जातो़? एकंदरीत शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे चिकुन गुनिया, डेंग्यू, हिंवताप, मलेरिया आदी रोगांनी थैमान घातले आहे. प्रत्येक वार्डाची पाहणी करूया, त्यानंतरच शहराची स्वच्छतेची परिस्थिती कशी आहे, हे समोर येईल, अशी भूमिका नगरसेवकांनी व आमदारांनी घेतल्यामुळे मनपा अधिकार्‍यांचे धाबे दणाणून गेले. 

मनपाचा आरोग्य व पर्यावरण विभाग कार्यक्षम असता तर वडगाव, खासबाग व उपनगरांमधून चिकुन गुनिया, डेंग्यूची साथ कशी उद्भवली, असा प्रश्‍न राजू बिर्जे यांनी मांडून मंगळवारचा दै ‘पुढारी’ सभागृहात दाखविला. ‘पुढारी’ सातत्याने वास्तव परिस्थिती छापते आहे, लोक आंदोलन करताहेत तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, अशी टीका त्यांनी केली. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर होणार्‍या पहिल्याच सर्वसाधारण सभेला पदसिद्ध सदस्य म्हणून उपस्थित नवे आमदार अ‍ॅड. अनिल बेनके, अभय पाटील आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही शहर स्वच्छतेचीच समस्या मांडून लोकांच्या आरोग्याकडे होणार्‍या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले.

आरोग्याधिकार्‍यांचे थातुरमातूर उत्तर

शहर स्वच्छतेसाठी कोणते नियम पाळले जातात, यावर निवेदन करताना आरोग्याधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा म्हणाले, शहरातील रस्त्यांची स्वच्छतेसाठी ए, बी, सी  अशी वर्गवारी केली असून ‘ए’ वर्गातील रस्त्यावरील कचरा रोज सकाळी उचलला जातो. तर ‘बी’ वर्गातील रस्त्यावरील केरकचरा आठवड्यातून दोन वेळा व ‘सी’ वर्गातील रस्त्यावरील केरकचरा आठवड्यातून एकदा उचलला जातो. बेळगाव शहरातील 97 टक्के कचरा घरोघरी जाऊन गोळा केला जातो.  त्यावर आ. अभय पाटील यांनी 3 टक्के कचरा कुठला़? तो का गोळा केला जात नाही? असा प्रश्‍न केला. उत्तर देताना डॉ. नाडगौडा म्हणाले, कणबर्गी, बसवणकुडची, मुत्यानट्टी आदी ग्रामीण भागामध्ये कचरा घरोघरी जाऊन गोळा करण्यामध्ये अडचणी आहेत. 

शहर स्वच्छतेसंबंधी 22 पॅकेज करण्यात आली आहेत. या 22 कंत्राटदारांकडून कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते का? ते करीत असल्यास शहरातील कोणत्या ठिकाणी ते केले जाते? त्याची ठिकाणे सांगा? या नगरसेवक व आमदारांच्या  प्रश्‍नावर आरोग्य अधिकारी निरुत्तर झाले. 

नगरसेविका मिनाक्षी चिगरे यांनी आपल्या मतदारसंघामध्ये गटार दुरूस्तीची कामे व रस्ता दुरूस्तीची कामेही कत्रांटदाराने पुर्ण केली नसल्याची तक्रार केली. राकेश पलंगे यांनीही 100 कोटी निधीमधून अनगोळ भागामध्ये बांधण्यात आलेल्या गटारींना स्लोप नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची तक्रार केली. 

डॉ. नाडगौडा यांनी प्रत्येक स्वच्छता कंत्राटदाराकडे दोन टिप्पर असल्याची माहिती दिली. त्यावर नगरसेवकांनी एका तरी स्वच्छता कंत्राटदाराकडे केरकचरा उचलण्याकरीता टिप्पर असल्याचे दाखवून द्या, असे आव्हान दिले. त्यावर आयुक्तासह आरोग्य अधिकारी  यांनी मौन धारण केले. नंतर महापौर बसाप्पा चिकलदिनी यांनी शहरातील सर्वच वार्डांची मनपा आयुक्त, आरोग्याधिकारी, आमदार व नगरसेवकांसोबत स्वच्छतेची पाहणी करण्याचा निर्णय जाहीर केला. 

अभियंत्याच्या बचावाचा प्रयत्न

मनपाचे पर्यावरण अभियंते उदयकुमार आरोग्य स्थायी समितीच्या वर्षभरातील दहापैकी एकाही बैठकीला आले नसल्याची तक्रार राजू बिर्जे यांनी केली. त्यावर विरोधी गटाचे दिपक जमखंडी, रमेश सोनटक्की आदिंनी स्थायी समिती अध्यक्षांना त्यांच्यावर कारवाई करता आली नाही, असा आरोप केला. त्यावर  सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर राजू बिर्जे म्हणाले, महापौरांनीच उदयकुमार तलवार बैठकीला सतत गैरहजर राहण्याबद्दल तक्रार केली होती. आता त्यांच्यावर आता आयुक्तांनीच कठोर कारवाई करावी.