Wed, Jul 24, 2019 12:10होमपेज › Belgaon › बंडखोरांच्या म्होरक्याला हटवा

बंडखोरांच्या म्होरक्याला हटवा

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 28 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व बंडखोरांची मते एकत्र केल्यास 11 हजार मतांचाही टप्पा गाठलेला नाही. म. ए. समितीचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर बंडखोरांच्या म्होरक्याला हटविण्याची मागणी करण्यात आली. तसेच जाहीर चर्चेसाठी एका व्यासपीठावर यावे, असे आव्हान शहर म. ए. समितीच्या बैठकीत देण्यात आले. सदर बैठक ओरिएंटल स्कूल येथे रविवारी सायंकाळी पार पडली.

सुरुवातीला कार्यकर्त्यांनी समिती उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. समितीचा पराभव नेमका कुणामुळे झाला, त्या बंडखोरांना बैठकीत बोलावून जाब विचारा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी होते. बैठकीला सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजीनदार प्रकाश मरगाळे, विजय पाटील आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी प्रचार करताना आपल्या पाठिशी 15 नगरसेवकांचे पाठबळ आहे. तसेच विविध भागातून आम्हाला भरघोस पाठिंबा मिळत असून, आमचा विजय निश्‍चित असल्याचा दावा करत नागरिकांची दिशाभूल चालविली होती.  मात्र, त्यांना मिळालेली मते पाहता नागरिकांनी त्यांना जागा दाखवून दिली आहे. सीमालढ्याला पाठबळ मिळावे यासाठी सर्वांनी एकाच छताखाली येणे गरजेचे आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा चर्चेसाठी एकाच व्यासपीठावर यावे, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

मध्यवर्ती समितीने बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, खानापूर मतदारसंघात अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या तिन्ही मतदारसंघात बंडखोर उमेदवारही उभारण्यात आले होते. त्यामुळे मतांची विभागणी होऊन मध्यवर्तीच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसला.

निवडणुकीपूर्वी म. ए. समितीमध्ये एकी होण्यासाठी सुरेश हुंदरे स्मृती मंच, युवा आघाडी आदी संघटनांतर्फे तसेच नागरिकांतर्फे शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आले होते. दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकीचे प्रयत्न झाले. मात्र नेते व बंडखोरांच्या हेकेखोरीमुळे एकी होऊ शकली नाही.

एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वावर ज्यांचा विश्‍वास नाही, त्यांना पुन्हा समितीमध्ये प्रवेश देऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.