होमपेज › Belgaon › केंद्राकडे 2 हजार कोटींची मागणी

केंद्राकडे 2 हजार कोटींची मागणी

Published On: Aug 31 2018 1:38AM | Last Updated: Aug 30 2018 10:52PMबंगळूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी नवी दिल्‍ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन कोडगूच्या पुनर्वसनासाठी 2 हजार कोटींची  मागणी केली. कोडगू जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे साडेतीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. कर्नाटक सरकारने तातडीने 49 कोटी रुपये मंजूर करून तातडीची कामे हाती घेतली. त्यानंतर 200 कोटी मंजूर करण्यात आले असून पूरग्रस्तांना घरे आणि इतर पुनर्वसनाची कामे त्यातून होणार आहेत.

याविषयी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. कोडगूतील स्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय पथक पाठविण्याचे आश्‍वासन मिळाल्याचेही ते म्हणाले. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेऊन त्यांना पूरस्थितीबद्दल कळविले आहे. तत्काळ आवश्यक निधी मंजूर करण्याची सूचना त्यांनी दिल्याचे कुमारस्वामी म्हणाले. कोडगूमध्ये पूर आला तर राज्यातील काही भागांत दुष्काळ आहे. काही जिल्ह्यांना दुष्काळी घोषित करावयाचे आहे. कर्नाटकातील अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर दुष्काळी जिल्हे घोषित केले जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली.