Mon, Apr 22, 2019 23:39होमपेज › Belgaon › सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मागणी

सेवा-सुविधांचा लाभ देण्याची मागणी

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:39PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

राज्य सरकारसह केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना तळागाळातील जनतेपयंर्ंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी आणि माध्यान्ह आहार योजनेतील कर्मचार्‍यांकडून केले जाते. मात्र या कर्मचार्‍यांना सरकारच्या कोणत्याच सेवासुविधा दिल्या जात नाहीत. या कामगारांनाही सरकारच्या सेवा-सुविधांचा लाभ करून देण्यात यावा, किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी करत एआययुटीयुसी अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

आशा कार्यकर्त्यांसह अंगणवाडी आणि माध्यान्ह आहार योजनेतील काम करणार्‍या महिला कर्मचार्‍यांना देशातील कामगार कायद्यानुसार कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी, त्यांना सरकारने जारी केलेल्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे. या कर्मचार्‍यांकडून सरकारच्या महत्वाकांक्षी योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य केले जात असले तरी सरकारकडून त्यांच्या मागण्यांचे दखल घेण्यात आलेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. 

आयसीडीएस योजनेमध्ये काम करणार्‍या 27 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. एनएचएम योजनेमध्ये 10 लाख आशा कार्यकर्त्या कार्यरत आहेत. माध्यान्ह आहार योजनेमध्ये 28 लाख महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यासह इतर योजनांमध्येही महिला कर्मचारी कार्यरत असून सरकारच्या योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करीत आहेत. सदर कर्मचार्‍यांसाठी किमान वेतन देण्याची मागणी अनेकवेळा करून देखील सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात  आले आहे. याची सरकारने त्वरित दखल घेऊन मागण्यांची पूर्तता करावी.

सदर कर्मचार्‍यांना कामगार म्हणून गणना करण्यात यावी, प्रतिमहिना किमान 18 हजार वेतन देण्यात यावे. निवृत्तीनंतर 3 हजार पेन्शन देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.