होमपेज › Belgaon › केकच्या मागणीत ५० टक्क्यांनी वाढ

केकच्या मागणीत ५० टक्क्यांनी वाढ

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 11:34PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

वाढदिवसाच्या निमित्ताने आठवल्या जाणार्‍या केकला आता ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी ख्रिसमस झाला तरी नववर्षामुळे बेकरी व्यवसायाला अच्छे दिन आले असून मागणीतही वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

दरवर्षी ख्रिसमस, नववर्षाचे स्वागत केक कापूनच करायचे, असा ट्रेंड वाढला आहे. बेकरी व्यावसायिकांकडून सजावटी केकची रोज सुमारे 50 टक्क्यापर्यंत विक्री वाढली आहे. साधारणत: दहा पंधरा वर्षापूर्वी वाढदिवसासाठी मोजक्याच घरातून केक आणला जात होता. यामध्ये बदल होऊन घराघरात पोचला आहे. विशेषत: आज सर्रास फे्रंडशिप, लव्हशिप, वाहन, कुत्रे, मांजरापासून म्हैस, बैलापर्यंतचा वाढदिवस साजरा केला जात आहे. यासाठी केक कापून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. काही वर्षात केकची मागणी वाढली आहे.

बेकरी व्यावसायिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सजावटीचे केक उपलब्ध करत आहेत. काही वर्षापूर्वी 50 ते 60 रुपयांना मिळणार्‍या छोट्या केकची किंमत आज 100 ते 150 रु.पर्यंत गेली आहे. काही दिवसांपासून नववर्षाच्या स्वागताच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला रात्री 12 पर्यंत आनंदोत्सव साजरा करीत 12 च्या सुमारास केक कापून नंतर नववर्षाचे स्वागत म्हणून मिष्टान्न सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे.  

बेकरीतून नियमित वापरल्या जाणार्‍या केकबरोबर शाकाहारी केक, पेस्ट्री केक, कप केक, प्लम केक, फू्रट केकला चांगली मागणी आहे. ऑरेंज, पायनापल, व्हेनिला मँगो, मिक्स फ्रुटचा फ्लेवर असलेल्या स्लाईस केकलाही मागणी आहे. रम, वाईन केक तरुणाईची पसंती असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

केकचे दरही काही प्रमाणात परवडणारे आहेत. किलोसाठी शाकाहारी केकचा दर 340, नियमित 320, पेस्ट्री 400, कपप्लम केक 160, फू्रट केक  160 रु. प्रमाणे असून कप केकचा दर 5 ते 10 रुपये नग आहे. युवावर्गात पार्टीपध्दतीने वाढदिवस आणि वेगळा आनंदोत्सव केला जात आहे. यामध्ये परीक्षा पास, दुचाकी व नवनवीन वस्तू खरेदीचे औचित्य साधून मेजवानीचे बेत आखले जात आहेत. आता तर कप केकचा वापर सर्वांकडूनच होत आहे.