Wed, Apr 24, 2019 08:30होमपेज › Belgaon › अंत्यविधीसाठी बेळगावात यापुढे मृत्यूदाखला सक्‍ती!

अंत्यविधीसाठी बेळगावात यापुढे मृत्यूदाखला सक्‍ती!

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:00AMबेळगाव : प्रतिनिधी

शहापूर मुक्‍तिधाम स्मशानभूमीत जिवंत स्त्री-अर्भकाला दफन करण्याचा प्रयत्न घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने पुढील काळात शहरातील सर्व स्शामनभूमीत महाराष्ट्राप्रमाणेच अंत्यसंस्कारासाठी मृत्यूदाखला सक्‍तीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या येत्या बैठकीत हा ठराव केला जाईल, अशी माहिती उपमहापौर मधुश्री पुजारी, मराठी गटनेते संजय शिंदे यांनी ‘पुढारी’ला दिली. 

महापालिकेने ठराव केल्यास तत्काळ अंमलबजावणी करू, असे आरोग्याधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा यांनी सांगितले. ठरावानंतर अंत्यविधीसाठी प्रमाणपत्र सक्तीची नजीकच्या काळात अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

शहापूर स्मशानभूमीत सोमवारी दोन महिन्यांच्या जिवंत बालिकेला पुरण्याचा प्रयत्न झाला. ‘पुढारी’ने हा प्रकार उघड करताच तत्काळ स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय मनपा सभागृहात घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी पोलिस आयुक्त राजप्पा यांनी अंत्यविधीपूर्वी मृतांबाबतची खातरजमा स्मशानभूमीत केले जातेय की नाही, याची माहिती घेतली. ती केली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करत महापालिका अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच शहापूर पोलिसांनाही मनपा अधिकार्‍यांशी चर्चा करण्याची सूचना केली. 

बेळगावात विविध ठिकाणी हिंदु-मुस्लीम, ख्रिश्‍चन, लिंगायत, पारसी व अन्य समाजांच्या स्मशानभूमी आहेत. स्मशानभूूमीत अग्नि अथवा दफनसंस्कार झाल्यानंतरच मृताबाबत नोंद करण्याची पद्धत कित्येक वर्षापासून आहे. तर लहान मूल अथवा अर्भकाच्या अंत्यविधीची नोंदच केली जात नाही. त्यामुळे मृताच्या संबंधितांनी दिलेल्या तोंडी माहितीद्वारे मृत्यू कारणाची नोंद  केली जाते. या पद्धतीमुळे गैरप्रकार घडू शकतात. मृत्यूदाखला सक्तीचा केल्यास हा प्रकार टळेल.

सोमवारी घडलेला प्रकार धक्कादायक होता. केवळ सतर्कतेमुळे मुलगी जिवंतपणी दफन होण्यापासून बचावली. मनपा बैठकीत अंत्यविधी प्रमाणपत्राबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. नागरिकांना ही त्या प्रमाणपत्राचे महत्व कळणे आवश्यक आहे, अशी माहिती उपमहापौर मधुश्री पुजारी, माजी महापौर किरण सायनाक, अनंत देशपांडे, पंढरी परब, संजय शिंदे यांनी पुढारीकडे  व्यक्त केले. 

*महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांपूर्वी मयताच्या मृत्यूचे रुग्णालयातील प्रमाणपत्र तसेच व्यक्ती घरी मृत झाल्यास डॉक्टर अथवा संबंधित विभागाच्या लोकप्रतिनिधीचे पत्र दाखविणे आवश्यक आहे. प्रमाणपत्राशिवाय अंत्यविधीस परवानगी दिली जात नाही. त्यामुळे स्मशानभूमीत गैरप्रकार घडत नाहीत. 

सोमवारी शहापूर, स्मशानभूमीत घडलेल्या प्रकाराप्रसंगी संबंधितांकडे अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र नव्हते. त्या प्रकाराची जोरदार चर्चा झाल्यानंतर अंत्यविधीसाठी मृत्यू प्रमाणापत्राबाबतचे गांभीर्य पोलिस प्रशासनालाबी कळाले आहे. पोलिस आयुक्त राजप्पा यांनी त्याबाबत मनपाला सूचना करण्याचे फर्मान सोडले आहे. 

दरम्यान, ‘ते’ अर्भक मेंदूज्वराने आजारी असून, मृत झाल्याचे समजून त्याला स्मशानभूमीत आणण्यात आले होते. ते जिवंत असल्याचे समजल्यानंतर पालकांनी त्या अर्भकाला रुग्णालयात दाखल केले आहे.