होमपेज › Belgaon › बंडखोरांच्या म्होरक्याच्या अंगणात फटाके फेकले

बंडखोरांच्या म्होरक्याच्या अंगणात फटाके फेकले

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 17 2018 1:04AMबेळगाव : प्रतिनिधी  

मध्यवर्ती म. ए. समितीच्या उमेदवारांना निवडणुकीत पाडून मराठी माणसांचा बुद्धिभेद करणार्‍या बंडखोरांच्या म्होरक्याच्या घरासमोर मंगळवारी रात्री विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी फटाक्यांच्या माळा अंगणात फेकल्या.

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे समर्थक उशिरापर्यंत टिळकवाडी भागात फटाके वाजवत होते. ते बंडखोरांच्या म्होरक्याच्या घरासमोर आले असता काही युवकांनी विजयी उमेदवाराच्या नावाने घोषणा देत म्होरक्याच्या बंगल्याच्या अंगणात फटाक्यांच्या माळा फेकल्या. काही युवकांनी फाटकावर फटाके फेकले. त्यानंतर काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या युवकांना बाजूला नेले.निवासस्थानासमोर फटाके उडवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

याबाबत टिळकवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता, फटाके उडवल्याचा आणि गुलाल उधळल्याचा व्हिडीओ आमच्यापर्यंत पोहोचला असला तरी कुणी तक्रार नोंदवलेली नाही, अशी माहिती दिली. दगडफेक झाल्याची अफवाही पसरवण्यात आलेली आहे; पण तसे झालेले नाही, असेही टिळकवाडी पोलिसांनी सांगितले.

निवडणूक काळात मराठी भाषिकांमध्ये सतत गैरसमज निर्माण करण्याचे काम या म्होरक्याने केले. आता निकालानंतर सीमाबांधवांसह  अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून म्होरक्याला लक्ष्य करण्यात येत आहे.